T20 Cricket : 6 जुलै रोजी नवी दिल्लीमध्ये दिल्ली प्रीमियर लीग 2025 चं (Delhi Premier League) ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये भारताचे दिग्गज क्रिकेटर्स विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या कुटुंबातील युवा खेळाडू चर्चेचा विषय ठरले. यंदा प्रथमच टी 20 लीगच्या या ऑक्शनमध्ये आर्यवीर कोहली आणि आर्यवीर सहवाग यांनी सहभाग घेतला होता. आर्यवीर कोहली (Aaryavir Kohli) हा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) मोठ्या भावाचा मुलगा आहे, तर आर्यवीर सेहवाग (Aaryavir Sehwag) हा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) मुलगा आहे. दोघेही यंदा प्रथमच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतील. यंदा ऑक्शनमध्ये एकूण 520 खेळाडूंनी सहभाग घेतला होता, ज्यात क्रिकेट विश्वातील अनेक स्टार खेळाडूंच्या नावाचा समावेश होता.
विराट कोहलीचा पुतण्या आर्यवीर कोहली सध्या 15 वर्षांचा असून त्याला साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने 1 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलं. आर्यवीर हा एक लेग स्पिन गोलंदाज असून त्याने अद्याप दिल्लीच्या सीनियर संघात पदार्पण केलेलं नाही. तो दिल्ली अंडर 16 चा रजिस्टर खेळाडू असून तो वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये विराटच्या लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. आर्यवीर कोहलीला दिल्ली प्रीमियर लीग 2025 मध्ये आयुष बदोनीच्या नेतृत्वात संधी मिळेल.
वीरेंद्र सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवाग हा दिल्ली प्रीमियर लीग 2025 मध्ये सेंट्रल दिल्ली किंग्सकडून खेळताना दिसेल. सेंट्रल दिल्ली किंग्सने त्याला 8 लाख रुपयांना करारबद्ध केलंय. सेहवागचा मुलगा आर्यवीर हा १७ वर्षांचा असून तो दिल्ली अंडर-19 साठी खेळतो, त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो मध्यंतरी चर्चेत आला होता. आर्यवीर सेहवागला आपल्या संघात घेण्यासाठी ऑक्शनमध्ये संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. सेंट्रल दिल्ली किंग्सने त्याला 8 लाखांना करारबद्ध केलं. सेहवागचा लहान मुलगा वेदांत हा ऑफ-स्पिनर असून तो दिल्ली जूनियर क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. परंतु तो या ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला.
दिल्ली प्रीमियर लीग 2025 च्या ऑक्शनमध्ये सिमरजीत सिंह हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. सिमरजीत सिंहला सेंट्रल दिल्ली किंग्सने 39 लाख रुपयांना विकत घेतलं. तर दिग्वेश राठीला साउथ दिल्ली सुपरस्टार्सने 38 लाख रुपयांना खरेदी केलं. नितीश राणाला वेस्ट दिल्ली लायंसने 34 लाख रुपए तर प्रिंस यादवला नवी दिल्ली टायगर्सने 33 लाखांना करारबद्ध केलं.