Eng vs Ind: लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाचा तोंडचा घास हिरावून घेत झालेल्या पराभवानंतर अनेक चाहते दुखावले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. भारतीय संघ 193 धावांचं आव्हान पूर्ण करु शकला नाही आणि 170 धावांवर सर्वबाद झाला. रवींद्र जाडेजासह जसप्रीत बुमराह आणि सिराज यांनी संघाला विजयापर्यंत नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने पराभवासाठी मोहम्मद सिराज आणि कर्णधार शुभमन गिलला जबाबदार धरलं आहे.
पहिल्या डावात बुमराहने तीन विकेट घेतल्या असताना, सिराजने चेंडू बदलून मागितल्याने भारताची लय बिघडली अशी टीका कैफने केली आहे. कैफच्या म्हणण्यानुसार, यामुळे जेमी स्मिथ आणि ब्रायडॉन यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याची संधी मिळाली.
"मोहम्मद सिराज नेहमीच भावनिक असतो. त्यामुळे त्याची मागणी मान्य करुन चेंडू बदलणं ही खूप मोठी चूक होती. जेव्हा चेंडू बदलण्यात आला तेव्हा तो वळत नव्हता," असं मत कैफने त्याच्या युट्यूब चॅनेलवर मांडलं आहे. मोहम्मद कैफने शुभमन गिलने तिसऱ्या दिवशी क्रॉलीच्या विकेटनंतर केलेल्या सेलिब्रेशनवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
"जर क्रॉली तिसऱ्या दिवशी बाद झाला नसता तर तो दुसऱ्या दिवशी बाद होऊ शकला असता. तो चांगल्या फॉर्ममध्ये होता का? तो जो रूट नाहीये. हे आमच्यासाठी नुकसान होते. गिलने आपला संयम गमावला, सिराज त्याच्यासोबत आला आणि नंतर रेड्डी त्याला बाद केल्यानंतर आनंद साजरा करत होता. तुम्ही आक्रमकता दाखवू शकता पण ते योग्य वेळी करायला हवे. त्यांनी योग्य वेळ निवडली नाही," असं मत त्याने मांडलं.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी पाचव्या दिवशी जाणूनबुजून बुमराहला फक्त बाद नव्हे तर जखमी करण्याचा प्रयत्न केला असा दावाही कैफने केला.
"स्टोक्स आणि आर्चर यांनी बुमराह खेळत असताना बाउन्सर टाकण्याची योजना आखली होती. जर तो बाद झाला नाही तर त्याच्या बोटावर किंवा खांद्यावर मारून दुखापत करण्याचा प्रयत्न होता. अनेकदा गोलंदाजांच्या मनात मुख्य गोलंदाजाला दुखापत करण्याचा हेतू असतो, ज्याच्याविरुद्ध आपल्या फलंदाजांना फलंदाजी करणे कठीण जाते. ही योजना नंतर (त्याला बाद करण्यासाठी) कामी आली," असं कैफ म्हणाला.
भारत आता पाच सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. यानंतर मँचेस्टर आणि लंडन (द ओव्हल) येथे सामने खेळले जाणार आहेत.