What Is Backfoot No Ball: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वातील लीग स्टेजमधला शेवटचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विक्रमी कामगिरी करत तब्बल 228 धावांचं लक्ष्य गाठत पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसरं स्थान पटकावलं. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा हा सामना आरसीबीने 6 विकेट्स आणि 8 बॉल शिल्लक असतानाच जिंकला. मात्र या सामन्यामध्ये निर्णयाक क्षण ठरला तो 17 व्या ओव्हरचा पहिला बॉल. खरं तर या बॉलवर आरसीबीला सामना जिंकून देणारा कर्णधार जितेश शर्मा झेलबाद झाला. मात्र तो मैदानाबाहेर जाण्यापूर्वी पंचांनी नो बॉल तपासला असता खरोखरच दिग्वीश राठीने टाकलेला चेंडू नो बॉल निघाला.
विशेष म्हणजे हा सामान्यपणे टाकला जातो तसा फ्रंट फूट नो बॉल म्हणजेच पुढचा पाय क्रिजच्या पुढे पडल्याने देण्यात आलेला नो बॉल नव्हता तर 'बॅक फूट नो बॉल' होता. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर What Is Back Foot No Ball यासंदर्भात चाहते चर्च करताना दिसले. प्लेऑफमधील सामने कोणाविरुद्ध कोण खेळणार याचा निर्णय अप्रत्यक्षपणे या नो बॉलमुळेच लागला कारण या नंतर शंशांकने संयमी खेळी करत आरसीबीला सामाना जिंकवून दिला. मात्र चार संघांचं भवितव्य निश्चित केलेला आणि सामना आरसीबीच्या बाजूने फिरवणारा हा 'बॅक फूट नो बॉल' प्रकार असतो तरी काय? समजून घेऊयात...
वैयक्तिक 49 धावांवर खेळत असताना जितेश शर्माने दिग्वीश राठीच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू थेट आयुष बदोनीच्या हातात विसावल्यानंतर दिग्वीश राठीने क्रिजवरच काहीतरी लिहिण्याचा अभिनय करत आपलं खास सेलिब्रेशन केलं. मात्र आता या विकेटमुळे सेट झालेली जितेश आणि मयांक अग्रवालची जोडी फुटते आणि सामन्यात अजून एक ट्विस्ट येतो की काय असं वाटत असतानाच पंचांनी दिग्वीशने टाकलेला चेंडू 'बॅक फूट नो बॉल' असल्याचं जाहीर केलं आणि फ्री हीटचा इशारा केला. पुढच्या चेंडूवर जितेशने खणखणीत षटकार लगावत आपलं अर्धशतक सारं केलं. त्यानंतर नाबाद राहत जितेशने संघाला विजय मिळवून दिला. मात्र जितेश ज्या 'बॅक फूट नो बॉल'मुळे वाचला तो प्रकार काय असतो याची चर्चा इंटरनेटवरही दिसून आली. 'बॅक फूट नो बॉल' चा नियम काय आहे हे पाहूयात..
नक्की वाचा >> IPL 2025 Playoffs Timetable: मुंबई अन् गुजरातचा RCB कडून 'टप्प्यात कार्यक्रम'... 30 तारखेला Final पूर्वीची Final
क्रिकेटमध्ये 'बॅक-फूट नो-बॉल' तेव्हा होतो जेव्हा चेंडू टाकताना गोलंदाजाचा मागचा पाय रिटर्न क्रीजवर (बॉलरच्या क्रीजच्या मागे काढलेली रेषा) किंवा त्याच्या बाहेर पडतो. म्हणजेच स्टम्प ज्या ठिकाणी रोवलेले असतात त्याला लागून काढलेल्या रेषेच्या आधीच पाय पडला तर तो नो बॉल ठरतो. म्हणजेच चेंडू टाकताना दोन्ही पायांपैकी मागचा पाय क्रिजवर स्टम्पजवळ आखलेल्या बॉक्समध्येच असला पाहिजे. गोलंदाजाचा मागचा पाय पूर्णपणे रिटर्न क्रीजच्या आत आला पाहिजे. असं नसेल तर तो 'बॅक फूट नो बॉल' ठरतो. दिग्वीशची हीच चूक झाली त्याला उजवा पाय या रिटर्न क्रीजच्या आलीकडेच होता म्हणून हा नो बॉल देण्यात आला.
लक्षाचा पाठलाग करताना अर्धा टप्पा ओलांडल्यावर विराट मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर सामना आरसीबीच्या हातून गेला असं मानलं जात होतं. मात्र मयांक अग्रवाल आणि जितेश शर्मा या दोघांनी 100 हून अधिक धावांची नाबाद भागिदारी करत संघाला 8 चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करताना हा आरसीबीचा सर्वात मोठा विजय ठरला.