Shahid Afridi : पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचं (Shahid Afridi) निधन झाल्याची धक्कादायक माहिति समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. यात दावा केला जात आहे की, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं निधन झालंय. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सुरु केलेलं ऑपरेशन सिंदूरनंतर शाहिद आफ्रिदीने भारतीय सेनेवर निशाणा साधून अनेक तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. शाहिद आफ्रिदीच्या निधनाच्या बातमी मागची सत्यता काय आहे याबाबत जाणून घेऊयात.
व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलं जातंय की, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचं निधन झालं आहे. कराचीमध्ये त्याचा दफनविधी पार पडला असून त्याचवेळी, असा दावा करण्यात आला की व्हिजन ग्रुपच्या अध्यक्षांसह अनेक अधिकाऱ्यांनी आफ्रिदीच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. मात्र जेव्हा या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात आली तेव्हा असे समोर आले की व्हायरल होत असलेला व्हिडीओ AI द्वारे बनवण्यात आलेला आहे, ज्यात जराही सत्यता नाही. माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची तब्येत उत्तम आहे आणि त्याच्या निधनाची बातमी खोटी आहे.
हेही वाचा : विजय माल्याने का खरेदी केली RCB ची टीम? 18 वर्षांनी केला खुलासा, ऐकून फॅन्सनाही आश्चर्य वाटेल
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने शाहिद आफ्रिदी सहित, शोएब अख्तर पाकिस्तानी खेळाडू आणि पाकिस्तानातील अनेक मोठ्या लोकांचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन केले होते. शाहिद आफ्रिदीने खूप पूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये आणि मागील काही काळापासून तो राजकारणात सक्रिय आहे.
शाहिद आफ्रिदीने 2017 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना 11 हजार हून अधिक धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधीक सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 351 सिक्स लगावले. रोहित शर्मा शाहिद आफ्रिदीचा हा रेकॉर्ड मोडण्यापासून फक्त 7 सिक्स दूर आहे.