Finn Allen World Record: मेजर लीग क्रिकेट 2025 ची थरारक सुरुवात आज (13 जून) ओकलॅंड कोलिजियमवर झाला. पहिलाच सामना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम खेळण्यात आलं. या सामन्यात न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन एलन याने टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवत जगभराचं लक्ष वेधून घेतलं. तो टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. अॅलनने अवघ्या 51 चेंडूंमध्ये 151 धावा करत टी20 च्या एका सामन्यात सर्वाधिक 19 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी हे विक्रम क्रिस गेल आणि साहिल चौहान यांच्या नावावर होते. त्यांनी प्रत्येकी 18 षटकार ठोकले होते. मात्र, अॅलनने हे रेकॉर्ड मोडीत काढत एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
फक्त षटकारच नाही, तर फिन अॅलन हा टी20 मध्ये सर्वात वेगवान 150 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी अवघ्या 49 चेंडूंमध्ये केली आहे. त्याच्या या धडाकेबाज खेळीची चर्चा होत आहे. त्याच्या बॅटमधून 19 षटकार आणि 5 चौकार झळकले. त्याचा त्यावेळी स्ट्राईक रेट तब्बल 296.08 असा होता.
END OF AN ICONIC INNINGS BY FINN ALLEN IN MAJOR LEAGUE CRICKET
— Johns. (@CricCrazyJohns) June 13, 2025
- 151 runs from just 51 balls including 5 fours & 19 sixes in the first match of 2025 season, one of the Greatest batting performance in T20 History. pic.twitter.com/ZhG3OaACH3
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स ने 20 षटकांत 5 बाद 269 अशा धावा केल्या. फिन अॅलनने सर्वाधिक 151 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याला हसन खान (18 चेंडूंमध्ये नाबाद 38) आणि संजय कृष्णमूर्ती (20 चेंडूंमध्ये 36) यांची चांगली साथ लाभली.
प्रत्युत्तरात 270 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली वॉशिंग्टन फ्रीडम संघ 13.1 षटकांत 146 धावांवर गारद झाली. रचिन रवींद्र (17 चेंडूंमध्ये 42) आणि मिचेल ओवेन (20 चेंडूंमध्ये 39) यांनी काहीसा प्रयत्न केला, पण संघाला 123 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
फिन अॅलनच्या या अद्वितीय कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमींना एक नेहमीच लक्षात राहील असा सामना अनुभवायला मिळाला आणि टी20 क्रिकेटमध्ये एक नवीन अध्याय लिहिला गेला.