West Indies vs Australia: लॉर्ड्सवर भारत-इंग्लंड कसोटी रंगली असताना, जगाच्या दुसऱ्या टोकाला, जमैकामध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात घडलेली एक घटना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहून गेली. लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने 22 धावांनी पराभव स्वीकारला, पण त्याच दिवशी जमैकामध्ये काहीतरी असं घडलं, जे याआधी कधीही पाहायला मिळालं नव्हतं.
जमैकामध्ये वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात तब्बल 7 फलंदाज शून्यावर बाद झाले. 148 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. याआधी एका डावात सहा फलंदाज शून्यावर बाद होण्याचा विक्रम 9 वेळा घडला होता, पण यावेळी सात जणांची शून्यावर परेड लागली.
या ऐतिहासिक शून्यांच्या यादीत वेस्ट इंडिजच्या जॉन कॅम्पबेल, केवलॉन अँडरसन, ब्रेंडन किंग, रोस्टन चेज, शेमार जोसेफ, जोमेल वॉरिकन आणि जाइडन सील्स यांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर 204 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण वेस्ट इंडिजचा डाव फक्त 27 धावांवर आटोपला. हा वेस्ट इंडिजच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या असलेला डाव ठरला. जगाच्या कसोटी इतिहासातही हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी स्कोअर आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे ज्यांनी 1955 मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त 26 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने वेस्ट इंडिजच्या डावाला अक्षरशः उद्ध्वस्त केलं. त्याने केवळ 15 चेंडूत 5 बळी घेतले. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एवढ्या कमी चेंडूत पाच बळी घेणारा स्टार्क हा दुसराच गोलंदाज ठरला. याआधी एर्नी टोशॅक (1947), स्टुअर्ट ब्रॉड (2015), आणि स्कॉट बोलंड (2021) यांनी 19-19 चेंडूत 5 बळी घेतले होते.
मिचेल स्टार्कने या सामन्यात 6 बळी घेतले आणि त्याचवेळी त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील 400 बळी पूर्ण केले. डेल स्टेननंतर सर्वात कमी चेंडूत 400 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. त्याने हे विक्रम आपल्या 19062व्या चेंडूवर गाठले.
स्टार्कने विकेट्सचा धडाका लावल्यानंतर स्कॉट बोलंडनेही काही कमी केलं नाही. बोलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या टेस्ट कारकिर्दीतील पहिली हैट्रिक घेतली. टेस्ट क्रिकेटमध्ये हैट्रिक घेणारा तो ऑस्ट्रेलियाचा दहावा आणि जगातील 45वा गोलंदाज बनला.