IPL 2025: लखनऊ (Lucknow Supergiants) संघाचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनऊ संघाने तब्बल 27 कोटी मोजत ऋषभ पंतला संघात घेतलं. त्यामुळे ऋषभ पंतकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती. मात्र याउलट ऋषभ पंत या हंगामातील सर्वात मोठा अपयशी खेळाडू ठरला आहे. त्याने 10 सामन्यात फक्त 128 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच वेळा त्याने फक्त एक अंकी धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एकदा तो शून्यावर बाद झाला होता. रविवारी पंजाबविरोधातील सामन्यात ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. 237 धावांचा पाठलाग करताना पंत 17 चेंडूत 18 धावा करुन बाद झाला. लखनऊने 37 धावांनी हा सामना गमावला. 11 पैकी 6 सामने गमावल्याने लखनऊ संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅरॉन फिंच याने ऋषभ पंतने विकेटकिपरची भूमिका निकोलस पूरनकडे सोपवावी असं मत नोंदवलं आहे. "तुम्ही जेव्हा विकेटकिपर असता तेव्हा नेतृत्व करणं खरंच कठीण असतं. स्टॉप क्लॉक नियमामुळे तुम्हाला गोलंदाजाशी संवाद साधण्यासाठी अवघे काही सेकंद मिळतात. ती वेळ फारच कमी असते. ते फार कठीण ठरु शकतं. गोलंदाजाची योजना प्रत्येक चेंडूनुसार बदलू शकते, त्याचप्रमाणे पंतचीही बदलू शकते. जेव्हा गोष्टी ठरल्याप्रमाणे होत नाहीत तेव्हा तो किती संतापलेला असतो हे तुम्ही पाहू शकता", असं फिंच म्हणाला आहे.
"कदाचित त्याने आता पूरनला तू विकेटकिपर हो हे सांगण्याची वेळ आली आहे. मला जरा संघाला लयीत आणण्याची गरज आहे, सर्व योजनांची नीट अंमलबजावणी आणि गोलंदाजाशी थेट बोलण्याची गरज आहे," असंही त्याने म्हटलं.
2016 मध्ये पदार्पण केल्यापासून आयपीएल 2025 हा पंतसाठी सर्वात वाईट हंगाम ठरला आहे. पदार्पणाच्या हंगामात, पंतने 10 सामन्यांमध्ये 24.75 च्या सरासरीने 198 धावा केल्या, ज्यामध्ये एक अर्धशतक समाविष्ट होतं. सध्याच्या हंगामात, पंतची सरासरी 12.80 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट देखील पहिल्यांदाच 100 च्या खाली आला आहे. 122 आयपीएल सामन्यांमध्ये, पंतने 33.13 च्या सरासरीने 19 अर्धशतकं आणि एक शतकासह 3412 धावा केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने पंतला त्याचा आदर्श असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला फोन करावा, जेणेकरुन खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यास मदत होईल असा सल्ला दिला आहे.
"त्याच्याकडे मोबाईल आहे, फक्त त्याने तो उचलून कोणाला तरी फोन करण्याची गरज आहे. जर आपण नकारात्मक विचार करत आहोत असं वाटत असेल तर असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांच्याशी तुम्ही चर्चा करु शकता. धोनी त्याचा आदर्श आहे, त्यामुळे त्याला फोन करु शकतो. तो त्याला मदत करेल," असं सेहवाग म्हणाला आहे.
पुढे तो म्हणाला की, "मला वाटतं की ऋषभ पंतने आपले आयपीएलमधील जुने व्हिडीओ पाहावेत, जेव्हा तो चांगल्या धावा करत होत्या. त्यामुळे त्याला आत्मविश्वास मिळेल. बऱ्याचदा आपण आपली दैनंदिनी विसरतो. ऋषभ पंत त्याच्या दुखापतीपूर्वीच्या तुलनेत सध्या पूर्णपणे वेगळा आहे. मला आठवतंय की 2006-07 मध्ये जेव्हा मी धावांसाठी संघर्ष करत होतो, तेव्हा मला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं आणि नंतर राहुल द्रविडने मला परत जाऊन माझ्या दिनचर्येची तपासणी करायला सांगितलं होते जेव्हा मी धावा करत होतो. कधीकधी, जेव्हा तुमच्या दैनंदिनीत अडथळे येतात तेव्हा त्याचा धावांवर परिणाम होतो".