India vs England: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये इंग्लंडविरोधातील अखेरच्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बुमराह भारतीय संघासाठी फार महत्त्वाचा गोलंदाज असल्याने त्याच्यावर फार ताण येऊ नये याची काळजी घेतली जाते. मालिका सुरु होण्याआधीच जसप्रीत बुमराह फक्त तीन सामने खेळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र पाचवा सामना निर्णायक असल्याने बुमराहने खेळावं असं मत अनेकांनी मांडलं होतं. पण आता वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव तो खेळणार नसल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. यादरम्यान इंग्लंड संघाचा माजी खेळाडू निक कॉम्पटनने बुमराहला सर्वात आधी भारतासाठी खेळावं असं आवाहन केलं आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू निक कॉम्प्टनने जसप्रीत बुमराहला भारतासाठी खेळण्याचा आग्रह केला आणि त्याच्या संघासाठी तो किती मोठी भूमिका बजावतो हे निदर्शनास आणून दिले. पाचव्या कसोटीत बुमराहच्या जागी आकाशदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आल्याची माहिती आहे. मालिकेपूर्वी, बीसीसीआयने बुमराह सर्व सामने खेळणार नाही असं स्पष्ट केलं होतं आणि त्याने आधीच 4 पैकी 3 सामने खेळले आहेत. तथापि, रेव्हस्पोर्ट्झशी झालेल्या संभाषणात कॉम्प्टन म्हणाला की, हा भारतासाठी अलिकडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक आहे आणि बुमराहने 'पुढील' सामना खेळला पाहिजे.
"जर हा अलिकडच्या भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या कसोटी सामन्यांपैकी एक नसेल, तर तू स्वतःला कशासाठी राखून ठेवत आहेस? त्याला आवश्यक असलेले उपचार घ्यावेत, प्रयत्न करावेत आणि बाहेर पडावं," असं कॉम्प्टन म्हणाला.
"आता हे त्याच्यावर अवलंहून आहे. मला वाटत नाही की तो जखमी आहे. कदाचित फक्त दुखत असेल किंवा थकलेला असेल. पण एक क्रिकेटपटू म्हणून तुमच्या आयुष्यात हे क्षण येत असतात. इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची तुम्हाला किती संधी मिळते? त्याच्या दुखापतीच्या इतिहासामुळे ही त्याची शेवटची संधी असू शकते," असंही तो पुढे म्हणाला.
सामना जिंकणं गरजेचं असताना बुमराह संघात नसणं भारतासाठी फार तोट्याचं ठरु शकतं असं भाकितही त्याने वर्तवलं आहे. "भारताला त्याची गरज आहे. जर तो चांगला खेळला तर मोठा निकाल लागू शकतो. मालिका 2-2 ने अनिर्णित राखणं नवा कर्णधार आणि प्रशिक्षसाठी मोठं यश असेल," असं त्याने सांगितलं आहे.
यापूर्वी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं होतं की, संघ रचनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि बुमराहसह सर्व गोलंदाज तंदुरुस्त आहेत. "शेवटच्या कसोटीसाठी संघाबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही," असं गंभीरने मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीनंतर सांगितलं होतं. "जसप्रीत बुमराह खेळेल की नाही याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. शेवटी, जो कोणी खेळेल तो देशासाठी कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल," असंही त्याने म्हटलं.