चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाला फक्त एकाच मैदानावर खेळावं लागत असल्याने विशेष फायदा मिळत असल्याचं इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर्स नासीर हुसेन (Nasser Hussain) आणि मायकल आथर्टन (Michael Atherton) यांनी म्हटलं आहे. भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी न मिळाल्याने आयसीसी हायब्रीड पद्धतीने सामने खेळवत आहे. याअंतर्गत भारतीय संघाचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये खेळवले जात आहेत. याउलट भारतीय संघ वगळता इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होत आहेत. याचा अर्थ ज्या संघाचा भारतीय संघासोबत सामना असेल फक्त त्यांना पाकिस्तानबाहेर खेळण्याची संधी आहे.
यामुळे आथर्टनच्या मते सलग दुसऱ्यांदा चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भारतीय संघासाठी ही जमेची बाजू आहे. भारतीय संघ जर सेमी-फायनल आणि फायनलसाठी पात्र ठरला तर ते सामनेही दुबईत खेळवले जातील. याचाच अर्थ प्रवास करावा लागत नसल्याने, एकाच शहरात वास्तव्यास असल्याने भारतीय संघाला या स्थितींचा फायदा होत आहे.
"फक्त दुबईमध्ये खेळत असल्याचा भारतीय संघाला फायदा होत आहे त्याचं काय? मला हा फायदा मोजणे कठीण वाटते, पण तो निर्विवाद आहे. ते फक्त एकाच ठिकाणी खेळत आहेत. त्यांना इतर अनेक संघांप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करावा लागत नाही," असं स्काय स्पोर्ट्सवर नसीर हुसेनशी बोलताना आथर्टन म्हणाला.
"म्हणूनच, निवड समिती दुबईतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करू शकते. आणि अर्थातच, जेव्हा ते तेथे पोहोचतील तेव्हा त्यांना त्यांचा उपांत्य सामना कुठे खेळणार आहे हे माहिती असेल. मला हा एक निर्विवाद फायदा वाटतो, परंतु किती मोठा फायदा आहे हे मोजणे कठीण आहे," असंही त्याने म्हटलं.
हुसेन आथर्टनशीच्या या मताशी नासीर हुसेनने सहमती दर्शवली. जेव्हा भारत त्यांचे सर्व गट अ सामने संपवून बाद फेरीत पोहोचेल, तेव्हा ते इतर कोणत्याही संघापेक्षा तेथील परिस्थितीशी अधिक जुळवून घेतील. विशेषतः उपांत्य फेरी, जिथे भारताचा प्रतिस्पर्धी गट ब मधील एक संघ असेल, जो दुबईला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा एकही सामना न खेळता येईल.
"हा एक फायदा आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम संघाला तो फायदा मिळत आहे. आणि मी काल एक ट्विट पाहिले ज्यामध्ये 'पाकिस्तान यजमान देश, भारताला घरचा फायदा' असे लिहिले होते. ते एकाच ठिकाणी, एका हॉटेलमध्ये आहेत, त्यांना प्रवास करण्याची गरज नाही. त्यांच्याकडे एक ड्रेसिंग रूम आहे. त्यांना खेळपट्टी माहित आहे, त्यांनी त्या खेळपट्टीसाठी निवड केली आहे," असं इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला.
"ते त्यांच्या निवडीमध्ये खूप हुशार होते. त्यांना कदाचित दुबई कसे असणार आहे हे माहित होते. त्यांनी त्यांचे सर्व फिरकी गोलंदाज निवडले. भारतीय माध्यमांमध्ये तुम्ही अतिरिक्त वेगवान गोलंदाज का निवडला नाही असा वाद झाला? हे सर्व फिरकी गोलंदाज का? आता त्यांनी हा निर्णय का घेतला हे समजत आहे," असं माजी कर्णधाराने सांगितलं.
संघात पाच फिरकी गोलंदाजांची निवड केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना प्रश्न विचारण्यात आले होते. पण पाकिस्तान विरोधातील सामन्यात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने एकत्रितपणे पाच विकेट्स घेतल्यामुळे हा निर्णय योग्य ठरला.
"इतर संघांना कराची, लाहोर आणि रावळपिंडीमधील वेगवेगळ्या परिस्थितीसाठी अंतिम संघ निवडावा लागेल. आणि नंतर त्यांना प्रवास करावा लागेल आणि त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. तर तो एक फायदा आहे पण दुसरे काय होऊ शकले असते? एकदा भारताने पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला, तर काय झाले असते? भारत-पाकिस्तानशिवाय अशी स्पर्धा होऊ शकत नाही. ती दुबईमध्ये व्हायला हवी होती," असं मत त्यांनी मांडलं आहे.