Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'आधी त्या ड्रेसिंग रुममध्ये जा आणि...', रवी शास्त्रींनी गौतम गंभीरला स्पष्टच सांगितलं, 'तुला त्या खेळाडूंची....'

इंग्लंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक गौतम गंभीरला खेळांडूबाबत कडक भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.   

'आधी त्या ड्रेसिंग रुममध्ये जा आणि...', रवी शास्त्रींनी गौतम गंभीरला स्पष्टच सांगितलं, 'तुला त्या खेळाडूंची....'

इंग्लंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी परखड मत मांडलं आहे. त्यांनी सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरला ड्रेसिंग रुममध्ये कठोर भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. Sky Sports Cricket शी बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, "गौतम गंभीरने संघातील समस्यांना ठामपणे हाताळावं आणि वारंवार चुका करणाऱ्यांना जबाबदार धरावं. गरज लागल्यास त्याने खेळाडूंची यादीही तयार करावी".

भारतीय संघाने या सामन्यात अनेक संधी गमावल्या आहेत. पहिल्या डावात फक्त 41 धावांत भारताने आपले सात विकेट्स गमावले. दुसऱ्या डावातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. फक्त 32 धावात भारताने आपले सहा फलंदाज गमावले. क्षेत्ररक्षणातही भारत फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. भारतीय खेळाडूंनी 8 झेल सोडले ज्यामधील 6 पहिल्या डावात होते. भारतीय खेळाडूंनी गमावलेल्या या संधींमुळे 200 धावांचा फटका बसला. 

'मी काय इथे बसून...', इंग्लंडविरोधातील पहिल्या पराभवासाठी गौतम गंभीरने कोणाला ठरवले जबाबदार? म्हणाला 'तुम्ही जिंकताना...'

 

रवी शास्त्री यांनी यामध्ये कोचिंग स्टाफची मोलाची भूमिका असल्याचं म्हटलं आहे. "या स्पर्धेतून आपण सकारात्मक घ्यायला हवं. कर्णधार म्हणून शुभमन गिलने त्याच्याकडून अपेक्षा होता त्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे. त्याने शतक ठोकलं. या सामन्यात पाच शतकं झाली. जर काही सुधारायचं असेल तर मुलभूत गोष्टी सुधारायच्या आहेत. काही गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत," असं रवी शास्त्री म्हणाले. 

"झेल सुटणं हे आता त्याच्या नियंत्रणात नाही. तिथेच संघ अधिक मेहनत करू शकतो आणि सुधारणा करू शकतो. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही फलंदाजीला येता तेव्हा तुम्हाला तुमच्या विकेटची किंमत मोजावी लागते. तुम्ही बाहेर येऊन परिस्थिती बिघडवू शकत नाही. तुम्ही मैदानात चिकटून राहून 550 ते 600 धावा करु शकता," असं रवी शास्त्री म्हणाले. 

"काही ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षक म्हणून कधीकधी कठोर व्हावे लागते. त्या ड्रेसिंग रूममध्ये खरोखरच कठोर वागावं लागेल. काही गोष्टी आहेत जिथे तुम्हाला खेळाडूंची नोंद करावी लागते. पण, या कसोटीत बरेच सकारात्मक पैलू होते," असंही ते म्हणाले. 

दरम्यान पराभवानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने आपण झेल सोडल्याबद्दल कोणत्याही एका खेळाडूला जबाबदार धरणार नाही असं म्हटलं आहे. "झेल सुटतात, जगातील सर्वोत्तम खेळाडूही झेल सोडतात. कोणीही जाणुनबुजून ते सोडत नाही," असं गौतम गंभीर म्हणाला आहे. पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालने क्षेत्ररक्षण करताना 4 झेल सोडले.भारतीय खेळाडूंनी एकूण 8 झेल सोडले ज्यामधील 6 पहिल्या डावात होते. 

"मी इथे बसून प्रत्येकाचं नाव घेत तळातील खेळाडूंनी योगदान दिलं नाही असं म्हणणार नाही. आम्ही एकत्र हारलो आणि एकत्र जिंकलो," असं त्याने म्हटलं. पुढे तो म्हणाला "प्रत्येक पराभव हा वेदना देणारा असतो मग संघ तरुण असो किंवा अनुभवी असो. हा भारतीय संघ आहे. पराभवासाठी आम्ही हे कारण देणार नाही, आम्ही 140 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करतो". दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरु होणार आहे. 

Read More