चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने दारुण पराभव केल्यानंतर पाकिस्तान संघावर सडकून टीका केली जात आहे. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड संघ पात्र ठरल्याने यजमान पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाद झाला आहे. यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन आणि माजी खेळाडू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) वेळापत्रकावरुन शंका उपस्थित केली आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरोधात खेळत स्पर्धेची सुरुवात का केली नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. तसंच त्यांनी पाकिस्तान संघाच्या धोरणावरही टीका केली आहे. "मला कळत नाही की पाकिस्तान संघाने पहिला सामना न्यूझीलंडविरोधात का खेळला? त्यांनी बांगलादेशविरोधात पहिला सामना खेळायला हवा होता. बांगलादेश भक्कम संघ असला तरी पाकिस्तान संघाला हा सामना सोपा गेला असता," असं रमीझ राजा यांनी म्हटलं आहे.
रमीझ राजा यांच्या मते जर बांगलादेशविरोधात पहिला सामना झाला असता तर प्रत्येक संघावर समान दबाव आला असता आणि न्यूझीलंडला फायदा मिळाला नसता. न्यूझीलंडने पराभव केल्यानंतर पाकिस्तान संघावर दबाव आला आणि यामुळे भारतासोबतचा सामनाही गमावला.
न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केल्यानंतर भारताविरोधातील सामन्याआधी त्यांच्यावर दबाव आला होता. पाकिस्तानला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय हा एकमेव पर्याय होता. पण भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून दारुण पराभव केला.
"ते न्यूझीलंडविरोधात खेळले आणि पराभव झाला. या पराभवामुळे पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. मला कळत नाही पाकिस्तानने आपला पहिला सामना बांगलादेश किंवा भारताविरोधात का खेळला नाही? जर तसं झालं असतं तर दबाव समान असता," असा विश्वास रमीझ राजा यांनी व्यक्त केला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यात विराट कोहली विजयाचा मास्टरमाइंड ठरला. विराट कोहलीने पुन्हा एकदा आपण धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम खेळाडू असल्याचं सिद्ध केलं. विराट कोहलीने या सामन्यात आपल्या करिअरमधील 51 वं एकदिवसीय शतक ठोकलं आणि सर्वात वेगवान 14 हजार धावाही पूर्ण केल्या.
विराट कोहलीने जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असता चौकार लगावला आणि शतक पूर्ण केलं. "विराटच्या शतकात सगळं काही होतं. त्याच्यात संयम आणि आक्रमकपणा होता. त्याने गती चांगली ठेवली. एकूणच विराट कोहली एक पूर्ण पॅकेज होतं. तो स्वत:लाच आव्हान देत राहतो. तो प्रत्येक गोलंदाजाविरोधात आत्मविश्वासाने खेळतो आणि कोणालाही सेटल होऊ देत नाही," असं कौतुक त्यांनी केलं.