भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणि खासकरुन 1990 च्या दशकात असणाऱ्या हेन्री ओलोंगा हे नाव चांगलंच परिचयाचं असेल. आपले विचित्र केस आणि सचिन तेंडुलकरला नेहमी खुन्नस देणारा हेन्री ओलोंगा तसा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याचा शत्रूच होता. शारजाहमध्ये 1998 च्या कोका-कोला कप फायनलमध्ये सचिन तेंडुलकरने हेन्री ओलोंगाला अक्षरश: धुतला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 92 चेंडूत 124 धावा ठोकल्या होत्या. भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला होता. हेन्री ओलोंगाला फक्त सहा ओव्हर्समध्ये 50 धावा ठोकल्या होत्या.
पण यानंतर कोणीही अपेक्षा केली नव्हती इतक्या नाट्यमय घडामोडी त्याच्या आयुष्यात घडल्या. 2003 मध्ये, त्याने आणि त्याचा सहकारी खेळाडू अँडी फ्लॉवरने रॉबर्ट मुगाबे यांचा निषेध केला होता. वर्ल्डकप सामन्यात त्यांनी हातावर काळी पट्टी बांधून रॉबर्ट मुगावे यांच्या राजवटीत झिम्बाब्वेमध्ये झालेल्या "लोकशाहीच्या मृत्यू" विरोधात निषेध नोंदवला. यानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. अखेर हेन्री ओलोंगाला हद्दपार व्हावं लागलं होतं. तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. तिथे त्याने संगीतात करिअर केलं. 2019 मध्ये "द व्हॉइस" मध्येही त्याने भाग घेतला. ओलोंगाचा क्रिकेट ते संगीत हा प्रवास अनेकांच्या अपेक्षा होता तितका चांगला झाला नाही.
टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत ओलोंगाने त्याच्या खासगी आयुष्याबाबत खुलासे केले. हेन्री ओलोंगाने 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू असताना आणि त्याच्या देशातून हद्दपार होण्यापूर्वी त्याने रेकॉर्ड केलेल्या गाण्याचे बोल बोलून दाखवले.
'एक ओळ अशी आहे: "मी जरी दूरच्या सीमेवर गेलो तरी माझा आत्मा या माझ्या घरासाठी तळमळत राहील, कारण वेळ आणि जागा आपल्याला वेगळे करू शकतात, आणि तरीही ती माझे मन धरून आहे.' आणि दुसरी ओळ आहे, 'जसे आपण सर्वजण आपले राष्ट्र उभारण्यासाठी उभे आहोत, ही आपली भूमी आहे, आपला झिम्बाब्वे आहे.'"
या गाण्यातील काही शब्द, हे सध्या माझं आयुष्य कुठे आहे हे दाखवत आहेत. जेव्हा कधी मी ते गाणं ऐकतो तेव्हा काहीतरी उत्तेजक असतं असं तो सांगतो.
वृत्तपत्रानुसार, तो कधीही झिम्बाब्वेला परतला नाही. त्याने मागील 20 वर्षांपासून आपल्या वडिलांना पाहिलेलं नाही. तो आता त्याच्या YouTube चॅनेलवर म्युझिक रिलीज करतो आणि जिथे शक्य असेल तिथे कार्यक्रम सादर करतो. अलीकडेच तो क्रूझ जहाजांवर गाणे गात होता. "क्रूझ जहाजावर संगीत सादरीकरणाचा शिखर हाच असेल असे नाही. खरं तर, काही लोकांना वाटतं की गायक क्रूझ जहाजांवर मरण्यासाठी जातात," असं तो म्हणाला.
"पण मला काही फरक पडत नाही. माझ्या संगीताबद्दल मला अहंकार नाही. मी छोट्या गावांमध्ये गातो, मी शाळेतील मुलांसाठी गाणी गायली आहेत आणि मी तीन लोकांसमोर छोट्या बारमध्येही गायलो आहे. मला फक्त गाणे आवडते. मला सादरीकरण करायला आवडते," असं तो म्हणाला.
"मी सर्व प्रकारची कामे केली आहेत. मी लोकांच्या बोटी स्वच्छ केल्या आहेत. मी सार्वजनिक भाषणं केली आहे, ज्यामध्ये प्रेरणादायी आणि रात्रीच्या जेवणानंतरची भाषणं असतात. मी माझ्या आयुष्याचा आनंद घेत आहे असं म्हणणार नाही. कारण मी काही लोकांच्या नजरेत एक प्रकारचे कंटाळवाणे, खूप अंदाज लावता येणारे, कंटाळवाणे जीवन जगतो. परंतु किमान ते प्रामाणिक आहे आणि मी अडचणींपासून दूर राहतो," असं तो म्हणाला.