BCCI Angry On Jasprit Bumrah: भारत आणि इंग्लंडदरम्यान नुकत्याच झालेल्या अँडरसन-तेंडुलकर चषक स्पर्धेतील शेवटच्या कसोटीमध्ये शेवटच्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकून मालिका अनिर्णित ठेवण्यात यश आलं. मोहम्मद सिराजने या संपूर्ण मालिकेतील सर्व सामने खेळले. त्यामुळेच आता भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडून कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हा कठोर निर्णय सर्वच फॉरमॅटमध्ये सूसूत्रता आणण्यासाठी आणि वर्कलोड मॅनेजमेंटसंदर्भातील असणार आहे असं सांगितलं जातंय.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, "गंभीर, आगरकर आणि बीसीसीआयमधील इतर वरिष्ठांनी वर्कलोड मॅनेजमेंटविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली खेळाडूंची निवड केली जाते. तसेच हे खेळाडूही स्वत: सामने किंवा मालिका निवडण्याची मोकळीक घेतात. मात्र आता या अशा वागण्याविरोधात कडक कारवाई करण्याची बीसीसीआयची तयारी सुरु असल्याचे समजते. सोमवारी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी संपल्यानंतर यासंदर्भातील चर्चा आधीच झाली आहे. आता केंद्रीय स्तरावर बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या खेळाडूंना लवकरच नवीन निर्देशाची औपचारिक माहिती दिली जाईल, असं अहवालात म्हटलं आहे.
"यासंदर्भातील सर्व चर्चा झाल्या आहेत. बीसीसीआयने केंद्रीय करार केलेल्या खेळाडूंना, विशेषतः जे सर्व नियमित स्वरूपातील खेळाडू आहेत अशांना थेट संदेश दिला जाईल की नजीकच्या भविष्यात सामने निवडण्याची आणि न निवडण्याचा पर्याय दिला जाणार नसून कोणाचेही लाड होणार नाहीत," असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'पीटीआय'ला सांगितले.
"वर्कलोड मॅनेजमेंटचा विचारच केला जाणार नाही, असा याचा अर्थ नाही. मात्र नजीकच्या भविष्यात अधिक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन अपेक्षित आहे. अर्थातच, वेगवान गोलंदाजांच्या वर्कलोड मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. मात्र वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली महत्त्वाचे सामन्यांना खेळाडू उपलब्ध नसतील तर हे मान्य करता येणार नाही," असा स्पष्ट इशाराच बीसीसीआयकडून देण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सिराजने केलेल्या कामगिरीवर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकरांनी वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल आक्षेप नोंदवला होता. गावसकरांनी टीका केल्यानंतर आता बीसीसीआयच्या या निर्णयाची माहिती समोर आली आहे. खरं तर, मोहम्मद सिराज पाचही सामन्यांमध्ये खेळणाऱ्या फक्त दोन वेगवान गोलंदाजांपैकी होता. मोहम्मद सिराजने या मालिकेमध्ये 185.3 ओव्हर टाकल्या. मोहम्मद सिराजने 23 विकेट्स घेतल्या. भारत आणि इंग्लंडच्या संघातील कोणत्याही गोलंदाजाने एवढ्या ओव्हर या मालिकेत टाकलेल्या नाहीत.
"जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता, तेव्हा वेदना विसरायला हव्यात. सीमेवर, तुम्हाला असे वाटते का, जवान थंडीची तक्रार करत आहेत? ऋषभ पंतने तुम्हाला काय दाखवले? तो फ्रॅक्चरसह फलंदाजीसाठी आला. खेळाडूंकडून तुम्हाला अशीच अपेक्षा आहे. भारतासाठी क्रिकेट खेळणे हा एक सन्मान आहे," गावस्कर असं यांनी 'इंडिया टुडे'ला सांगितले.
"तुम्ही 140 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात आणि मोहम्मद सिराजमध्ये आम्हाला हेच दिसले. मला वाटते की सिराजने मनापासून गोलंदाजी केली. सिराजने त्याच्या गोलंदाजीमधून वर्कलोड मॅनेजमेंटसंदर्भातील सर्वच दावे खोडून काढले. पाच कसोटी सामन्यांमध्ये, त्याने न थांबता 7 ते 8 षटकांच्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली. कर्णधाराला आणि देशाला त्याच्याकडून अपेक्षा होत्या या एकमेव कारणासाठी तो गोलंदाजी करत राहिला," अशा शब्दांमध्ये गावसकरांनी सिराजचं कौतुक केलं.
"मला आशा आहे की 'वर्कलोड मॅनेजमेंट' हा शब्द भारतीय क्रिकेट शब्दकोशातून लवकरच हद्दपार होईल. मी बऱ्याच काळापासून हे सांगत आहे. मला वाटते की ही एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की हे वर्कलोड फक्त मानसिक आहे, शारीरिक नाही," असंही गावसकर पुढे म्हणाले.
जरी गावसकरांनी जसप्रीत बुमराहचा थेट उल्लेख टाळत वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल भाष्य केलं असलं तरी त्याचा इशारा त्याच्याकडेच होता. गावसकरांनी केलेल्या विधानानंतर पीटीआयच्या वृत्तात बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली सर्व कसोटी सामने न खेळणे बीसीसीआयमधील अनेकांना फारसे रुचलेलं नाही. बुमराहने अशाप्रकारे तीनच कसोटी खेळण्याचा निर्णय घेतल्याने बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये काम करणाऱ्या स्पोर्ट्स सायन्स टीमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान बुमराहला पाठीचा त्रास झाला आणि त्यामुळे तो एप्रिलच्या मध्यापर्यंत खेळू शकला नाही. त्याने आयपीएलमध्ये खेळून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली, त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलं. मात्र निवड समितीने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत केल्यानंतर स्पष्ट केले की 31 वर्षीय बुमराह त्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध फक्त तीन सामने खेळणार आहे.
बीसीसीआयला जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर चषक कसोटी मालिकेत वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली फक्त तीन सामने खेळण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी आहे. यामुळे बीसीसीआयच्या स्पोर्ट्स सायन्स टीमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बीसीसीआयने केंद्रीय करारबद्ध खेळाडूंना स्पष्ट निर्देश दिले आहेत की यापुढे सामने निवडण्याची किंवा न खेळण्याची मुभा दिली जाणार नाही. वर्कलोड मॅनेजमेंटसाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन अवलंबला जाईल, पण महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळाडूंना उपलब्ध राहावे लागेल.
मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाचही कसोटी सामने खेळले आणि 185.3 षटके टाकून 23 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीने वर्कलोड मॅनेजमेंटच्या दाव्यांना खोडून काढल्याचे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.