Rahul Chahar Story: भारतीय क्रिकेट संघाचा उगम पावलेला एक प्रतिभावान लेगस्पिनर आज वयाचा एक खास टप्पा गाठतोय . होय, आज राहुल चाहरचा वाढदिवस आहे. 4 ऑगस्ट 1999 रोजी राजस्थानच्या भरतपूरमध्ये जन्मलेल्या राहुलनं अवघ्या काही वर्षांत आयपीएलमध्ये नाव कमावलं आणि त्यानंतर भारतीय संघातही एंट्री घेतली.
राहुल चाहरचं भारतासाठी 2019 मध्ये डेब्यू झालं होतं. आतापर्यंत त्यांनी 5 टी20 आणि 1 वनडे सामना खेळला आहे आणि 10 विकेट्स घेतल्या आहेत. याच कामगिरीमुळे त्यांचं नाव T20 वर्ल्ड कपसाठीही चर्चेत आलं होतं. पण राहुलचं क्रिकेट प्रवास जितका यशस्वी, तितकाच रोचकही आहे.
त्याचा चुलत भाऊ दीपक चाहरकडून प्रेरणा घेत राहुलने सुरुवातीला वेगवान गोलंदाज बनायचं स्वप्न पाहिलं होतं . पण वेग नव्हता, टॅलेंटही कमकुवत होतं, हे त्याला लवकर समजलं. मग दीपकनेच त्याला लेगस्पिनर व्हायचा सल्ला दिला. दीपकची योजना स्पष्ट होती एकाच घरात दोन वेगवान गोलंदाज असले तर स्पर्धा निर्माण होते, त्यामुळे दोघांमध्ये वेगवेगळं कौशल्य असावं.
राहुल जेव्हा अकादमीत खेळायचा, तेव्हा तो सीनियर फलंदाजांना आउट करायचा. पण मोठ्या उत्साहात साजरा केलेला विकेटचा आनंद काही फलंदाजांना झेपायचा नाही. त्याचे कोचही कधी कधी त्याच्यावर चिडायचे, आणि नकळत त्याला शिक्षा व्हायची! आज त्याचं ते ‘विकेट सेलिब्रेशन’ त्याच्या यशाचं कारण आहे.
2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलं, तेव्हा राहुल चाहर त्या संघात नव्हता. निवड न झाल्यानं तो खूप दुखावला गेला होता. पण त्यानं हार मानली नाही याच अपयशानं त्याला अधिक मेहनत करायला भाग पाडलं. नंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थानही मिळालं. तो नेहमी म्हणतो, "सगळं काही चांगल्यासाठीच घडतं."
अनेकांना वाटतं राहुलचा आयडॉल पाकिस्तानचा एखादा स्पिनर असावा, पण प्रत्यक्षात तो इमरान ताहिरला आपला आदर्श मानतो. राहुल म्हणतो, "पूर्वी मी शेन वॉर्नला पाहायचो, पण आता इमरान ताहिरकडून शिकतो. तो कोणत्याही पिचवर, कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो." इतकंच नाही, तर राहुल इमरान ताहिरशी बोलून सल्लाही घेतो. इंग्लंड दौऱ्यावर अंडर-19 कसोटीत खेळताना त्याने ताहिरला कॉल करून मार्गदर्शन मागितलं होतं. इमरान ताहिर हा मूळचा पाकिस्तानचा, पण त्याला तिथल्या संघात संधी न मिळाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळू लागला.