Harbhajan Singh About Coach : भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक किंवा कर्णधार होणं हे काटेरी मुकुटासारखं आहे. तुमचा प्रत्येक निर्णय हा समीक्षकांच्या बंदुकीच्या टोकावर असतो, यापासून दिग्गज क्रिकेटर आणि टीम इंडियाचा हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळणारा गौतम गंभीर (Gautam Gambhir) सुद्धा वाचू शकला नाही. आधी केवळ दुसऱ्या देशातील क्रिकेटर आणि समीक्षक हे त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायचे मात्र आता गंभीर सोबत खेळलेल्या एका माजी खेळाडूने सुद्धा आता भारतीय संघाचा (Team India) कोचबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर गौतम गंभीर हा टीम इंडियाचा हेड कोच बनला होता. तो कोच बनल्यावर व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाने चांगले प्रदर्शन केलं, पण टीम इंडियाचा टेस्ट फॉरमॅटमध्ये मात्र संघर्ष करताना दिसतेय. तो कोच बनवल्यापासून टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज गमावली आहे. तर आता सुरु असलेल्या इंग्लंड सीरिजमध्ये सुद्धा भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने एक असा सल्ला दिलाय ज्यामुळे गौतम गंभीरला कोचिंग सोडावी लागू शकते.
माजी गोलंदाज हरभजन सिंहने एका मुलाखतीत सांगितलं की, भारताच्या व्हाईट बॉल आणि रेड बॉल संघासाठी वेगवेगळा कोच अपॉईंट करण्याबाबत विचार झाला पाहिजे. कारण या तीन फॉरमॅटमध्ये भारतीय संघ सुद्धा वेगळा आहे. हरभजनसिंहचं म्हणणं आहे की, जर वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कोच असतील तर वर्कलोड सुद्धा थोडा कमी होईल. हरभजन सिंहने म्हटलं की, 'मला वाटतं की वेगवेगळे कोच नियुक्त केले जाऊ शकतात. यात काहीही चुकीचं नाही. तुमच्याकडे वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ आहेत. आपण जर असं करू शकलो तर हा योग्य निर्णय असेल. यामुळे कोच सह सगळ्यांचं वर्कलोड कमी होईल.
लिजेंड्स चॅम्पियनशिप खेळण्यासाठी आलेल्या भारताच्या दिग्गज गोलंदाजाने सांगितले की, सीरिजच्या सुरुवातीला तयारी करण्यासाठी कोचला तयारीसाठी वेळ हवा असतो. मग तो कोणताही फॉरमॅट का असेलना. तुम्हाला सांगू इच्छितो की भारताने 'स्पिलट कोचिंग' ला लागू केलेलं नाही. पण मागील काही काळापासून वीवीएस लक्ष्मण कोचिंगचा कार्यभार सांभाळत आहे. हरभजनच्या या विधानावरून असे संकेत मिळत आहेत की जर ते लागू झाले तर गंभीरला किमान एका फॉरमॅटमधून हेड कोचचे पद सोडावे लागेल.