IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग या जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणाऱ्या स्पर्धेचा 18 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. 22 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) एका खेळाडूवर आयपीएल खेळण्यापासून 2 वर्षांचा बॅन लावला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू 2025 आणि 2026 च्या आयपीएलचा भाग असणार नाही.
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक (Harry Brook) याने शेवटच्या क्षणी आयपीएल 2025 मधून माघार घेतल्याने त्याच्यावर दोन वर्षांचा बॅन लावण्यात आला आहे. बीसीसीआयच्या एका नियमानुसार जो विदेश खेळाडू आयपीएल ऑक्शनमध्ये सिलेक्ट झाल्यावर दुखापतीच्या कारणाशिवाय स्पर्धेतून माघारी घेतो, अशा खेळाडूवर दोन सीजनसाठी प्रतिबंध लावण्यात येईल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार आता हा नियम हॅरी ब्रुकसाठी लावण्यात आलेला आहे. मागील वर्षीच फ्रेंचायझींसोबत BCCI ने काही नवीन नियम शेअर केले होते.
हेही वाचा : 6,6,6,6,6,6,6... सिक्सर किंग युवराज सिंहने इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाला दमदार फलंदाजीने धुतलं
हॅरी ब्रुकने आयपीएल 2025 मधून आपलं नाव परत घेतलं आहे. आपल्या इंग्लड संघातील करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हॅरीने असं केलंय. आयपीएल 2024 मध्ये सुद्धा हॅरीने त्याच्या आजीचं निधन झाल्यामुळे आयपीएलमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यावर्षी सुद्धा टूर्नामेंटला एक आठवडा असताना त्याने आयपीएलमध्ये भाग न घेण्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला. त्याने लिहिले की मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या सपोर्टरची माफी मागतो. पण इंग्लड क्रिकेटसाठी ही एक महत्वपूर्ण वेळ आहे.
हॅरी ने पुढे लिहिले की, मला आगामी मालिकेच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. मला माहित आहे की प्रत्येकाला हे समजेलच असे नाही. मला तशी आशाही नाही, पण मला जे योग्य वाटतं तेच करावं लागेल. माझ्यासाठी, माझ्या देशासाठी खेळणे हे नेहमीच माझे प्राधान्य आणि केंद्रस्थान असेल.
इंग्लड जूनमध्ये भारत विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ इंग्लडचा दौरा करेल. तर नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात बहुप्रतीक्षित एशेज सीरीज होईल. मात्र हॅरी ब्रुकच्या या निर्णयाने त्याच्या आयपीएल करिअरला मोठा धक्का बसला आहे. आता आयपीएल 2027 मध्ये तरी हॅरी पुनरागमन करू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल.