Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

राष्ट्रकुलाचा 'सोन्याचा' दागिना मिरवणाऱ्या 'महाराष्ट्राच्या सुने'वर कौतुकाचा वर्षाव

सिद्धूचे वडील आणि भाऊ नेमबाज असून तिचे पती आणि सासरेदेखील मोठे नेमबाज आहेत

राष्ट्रकुलाचा 'सोन्याचा' दागिना मिरवणाऱ्या 'महाराष्ट्राच्या सुने'वर कौतुकाचा वर्षाव

मुंबई : भारताची अव्वल नेमबाज असलेल्या हिना सिद्धूनं राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडलला गवसणी घातलीय. मूळची पंजाबची असलेली हिना ही महाराष्ट्राची सून असल्यानं महाराष्ट्राला तिचं कौतुक वाटतंय.  २८ वर्षीय नेमबाज असेलल्या हिना सिद्धू हिनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय. हिनानं आपल्या कारकीर्दीमध्ये राष्ट्रकूल स्पर्धेत प्रथमच वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतलाय. 

नेमबाजीची पार्श्वभूमी... 

यापूर्वी २०१० मध्ये हिनानं राष्ट्रकूल स्पर्धेत सांघित प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं. तिनं २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं असून १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक पटकावलय. हिनानं २००६ पासून नेमबाजी खेळायला सुरुवात केली. सिद्धूचे वडील आणि भाऊ नेमबाज असून तिचे पती आणि सासरेदेखील मोठे नेमबाज आहेत. 

fallbacks

महाराष्ट्राची सून

हिना सिद्धू ही मूळची पंजाबची असली तरी तिनं महाराष्ट्राचे अर्जुन पुरस्कार विजेते नेमबाज अशोक पंडित यांचा मुलगा आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज रोनक पंडित याच्याशी विवाह केला आहे. यामुळे हिनाची क्रीडा क्षेत्रात 'महाराष्ट्राची सून' अशी ओळख आहे. 

हिनाच्या  आत्तापर्यंतच्या कामगिरीचा आलेख हा उंचावतच राहिलेला आहे. हिनानं लंडन आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. याखेरीज २०१४ मध्ये विश्वचषकात रौप्य पदक पटकावलं असून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तर २०१७ मध्ये तिन मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांना गवसणी घातलीय.

रोनकची इच्छा अपूर्ण राहिली, पण... 

तिचे पती रोनक पंडित हे तिला आता प्रशिक्षण देत आहेत. दरम्यान आधी राष्ट्रकुल स्पर्धेच्या पूर्वी तिच्या पतीला अधिकृतरित्या भारतीय चमूतून जाण्यास नकार देण्यात आला होता. यामुळे हा विजय हिना आणि तिच्या पतीसाठी महत्त्वाचा ठरलाय. हिना सिद्धूच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान नक्कीच अभिमानानं उंचावली आहे. 

Read More