How much money the BCCI earned in FY24: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सध्या अक्षरशः पैशांच्या खाणीवर बसला आहे. रेडिफ्यूजन या संस्थेच्या अहवालानुसार, BCCI ने 2023-24 या आर्थिक वर्षात जवळपास 9714.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हिस्सा हा आयपीएलचा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आर्थिक वर्षात 9714.7 कोटी रुपये कमावले. यापैकी ५९ टक्के हा वाटा एकट्या आयपीएलचा आहे.
IPL म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याचं नव्हे तर हिऱ्याचं अंडं देणारी कोंबडी ठरली आहे. बीसीसीआयला IPL हे केवळ क्रिकेट स्पर्धा नाही, तर मोठा व्यवसाय ठरला आहे. या एकाच लीगमधून बीसीसीआयने जवळपास 59 टक्के उत्पन्न कमावलं आहे. 5761 कोटी रुपये फक्त IPL मधून मिळाले आहेत. द हिंदू बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार, BCCI ची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे. उर्वरित कमाई आंतरराष्ट्रीय सामने, मीडिया राइट्स आणि इतर स्रोतांमधून झाली आहे.
बीसीसीआयकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढवण्याची संधी आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, सीके नायडू ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धांमधूनही उत्पन्न वाढवता येईल, असा सल्ला रेडिफ्यूजनचे प्रमुख संदीप गोयल यांनी दिला आहे.
सध्या बीसीसीआयकडे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा रिजर्व फंड आहे. या रकमेवरून दरवर्षी सुमारे 1000 कोटी रुपयांचं व्याज मिळतं. बीसीसीआयच्या उत्पन्नात दरवर्षी 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जातंय. स्पॉन्सरशिप डील्स, मीडिया हक्क, आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाची आर्थिक ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.