ICC : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने यूएसए क्रिकेट बोर्ड (USAC) वर कारवाई करण्याची तयारी केली आहे. आयसीसीने यूएसए क्रिकेट बोर्डाला 12 महिन्यांचं गवर्नेंस नोटिस पाठवली होती. ज्याला पुढील महिन्यात एक आठवडा होईल. मिळालेल्या माहितीनुसार यूएसए क्रिकेट बोर्डाने आपल्या नेतृत्वात महत्वपूर्ण बदल करावेत किंवा तसं न केल्यास त्यांच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. यावर पुढच्या महिन्यात आयसीसीच्या वार्षिक सभेत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मागच्यावर्षी टी20 वर्ल्ड कपच्या समाप्तीनंतर जुलै महिन्यात आयसीसीने यूएसए क्रिकेट बोर्डला नोटीस पाठवली होती. आयसीसीने गेल्या वर्षी अनुपालन आणि सुधारणांवर लक्ष ठेवण्यासाठी सामान्यीकरण समितीची स्थापना केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रशासकीय अकार्यक्षमतेचा हवाला देत ही समिती स्थापन केली होती.
टाइम्स ऑफ इंडियानुसार या महिन्यात आयसीसीची टीम लॉस एंजेलिसला पोहोचली होती. जिथे त्यानं ऑलम्पिक आणि पॅरालम्पिक समिती सोबत मिटिंग केली होती. या बैठकीत सामान्यीकरण समिती आणि USAC चे काही वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. अहवालानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सतत इशारा देऊनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. सांगितलं जातंय की याविषयी आयसीसीने आपलं स्पष्ट मतं मांडलं आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिस ऑलम्पिकमध्ये क्रिकेट परतल्यानंतर, नेतृत्व बदलांची गरज आता वादाचा विषय राहिलेली नाही.
आयसीसीच्या टीमने यूएसए क्रिकेट बोर्डच्या काही अधिकाऱ्यांना त्यांचं पद सोडण्याचा आग्रह केला होता. काही अधिकारी हे राजीमाना देण्यासाठी तयार आहेत, पण काहीजण राजीनामा देण्यासाठी तयार नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार यूएसने आतापर्यंत यावर निर्णय घेतलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार यूएसए क्रिकेट बोर्डाचे अनेक अधिकारी राजीनामा देऊ शकतात. परंतु याबाबत आयसीसीने अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलेलं नाही.