ICC ODI World Cup 2023 Dates, Times and Venue: एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या (ICC World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा आज आयसीसीसी (ICC) म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं केली आहे. भारताचा पहिला सामना 5 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. तर भारत पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टेज सामना 15 ऑक्टोबर 2023 रोजी खेळवला जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज मुंबईमध्ये आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयोजित केलेल्या एका संयुक्त कार्यक्रमामध्ये या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. भारतामध्ये आयोजित केल्या जात असलेल्या या स्पर्धेला 100 दिवस शिल्लक असतानाच वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण 46 दिवस खेळवली जाणार आहे. स्पर्धेत 3 नॉकआऊट सामन्यांसहीत एकूण 48 सामने खेळवले जातील. भारतामध्ये पहिल्यांदाच संपूर्ण स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारताने यापूर्वी आपल्या आजूबाजूच्या देशांसहीत संयुक्तरित्या विश्वचषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मात्र यंदा ही स्पर्धा पूर्णपणे भारतातच खेळवली जाणार आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. 2023 च्या सेकेण्ड हाफमध्ये होत असलेल्या या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेशाठी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे संघ थेट पात्र ठरले आहेत. सध्या सुरु असलेल्या पात्रता फेरीमधून अतिम 2 संघ कोणते हे निश्चित होईल.
GET YOUR CALENDARS READY!
— ICC (@ICC) June 27, 2023
The ICC Men's @cricketworldcup 2023 schedule is out now #CWC23https://t.co/j62Erj3d2c
एकूण 10 शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.
> अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियम
> हैदराबाद - राजीव गांधी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, उप्पल
> धर्मशाला - हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
> दिल्ली - अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम
> चेन्नई - एमए चिदम्बरम स्टेडियम
> लखनऊ - इकाना क्रिकेट स्टेडियम
> पुणे - एमसीए क्रिकेट स्टेडियम (गहुंजे)
> बेंगलुरु - एम चिन्नास्वामी स्टेडियम
> कोलकाता - ईडन गार्डन
> मुंबई - वानखेडे स्टेडियम
पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक स्पर्धा 1975 साली आयोजित करण्यात आली होती. 7 जून 1975 रोजी इंग्लंड आणि भारतादरम्यानच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झालेली. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताला 202 धावांनी पराभूत केलं होतं. 14 दिवस चालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 21 जून रोजी खेळवण्यात आला. वेस्टी इंडिजच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 17 धावांनी पराभूत करुन पहिला विश्वचषक जिंकला होता. 1983 पर्यंत विश्वचषक स्पर्धा 60 षटकांची खेळवली जायची. पहिल्यांदा 1987 साली ही स्पर्धा 50 षटकांची खेळवण्यात आली.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ हा ऑस्ट्रेलियाचा आहे. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि या खेळाचा जनक असलेल्या इंग्लंडने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तर 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकली.