IND vs AUS Semi Final Umpire Warns Shubman Gill: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धमकेदार एन्ट्री घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी-फायनल भारताने पाच विकेट्स राखून जिंकत ही किमया साधली आहे. कर्णधार रोहित शर्माला टॉस जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी दबदबा निर्माण केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये भारताला कूपर कोनोलीच्या रुपात पहिली विकेट मिळाली. त्यानंतर काही वेळाने भारताविरुद्ध कायमच दमदार कामगिरी करणारी ट्रॅव्हिस हेड बाद झाला. मात्र हेडला बाद करणारा भारतीय उपकर्णधार शुभमन गिलला पंचांनी इशारा दिल्याचं पाहायला मिळालं. पण हा इशारा का देण्यात आला? नेमकं घडलं काय हे अनेकांना काळालं नाही.
सामन्यातील तिसऱ्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने कूपर कोनोलीला यष्टीरक्षक के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मात्र 2023 च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध दमदार खेळी करत भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेला ट्रॅव्हिस हेड फटकेबाजी करु लागला. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावत आपला इरादा स्पष्ट केला. हेड आता पुन्हा एकदा हेडएक म्हणजेच डोकेदुखी ठरणार असं भारतीय चाहत्यांना वाटत असतानाच कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला गोलंदाजीसाठी आणलं आणि जे अपेक्षित होतं तेचं घडलं. फिरकीपटूला फटकेबाजी करण्याच्या नादात ट्रॅव्हिस हेडने षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला. शुभमन गिलने ट्रॅव्हिस हेडचा कॅच घेतला. मात्र हा कॅच घेतल्यानंतर मैदानावरील पंचांनी शुभमनला वॉर्निंग दिली.
ट्रॅव्हिस हेडचा टायमिंग चुकल्याने त्याला जो षटकार अपेक्षित होता तो चेंडू सिमारेषेपलीकडे गेला नाही. लाँग ऑफला उभ्या असलेल्या गिलने धावतच हेडचा कॅच पकडला. मात्र कॅच पकडल्यानंतर गिलने लगेच चेंडू हातातून खाली टाकला. यावरुनच पंचांनी गिलला इशारा दिला. हेडला बाद ठरवण्यात आलं तरी गिललाही पंचांकडून वॉर्निंग मिळाली.
क्रिकेटच्या नियमांनुसार, चेंडू जेव्हा खेळाडूला स्पर्श करतो त्यानंतर त्याने काहीकाळ चेंडू पकडून ठेवला पाहिजे. बॉल आणि स्वत:च्या शरीरावर खेळाडूने नियंत्रण मिळवल्यानंतर कॅच पूर्ण झाला असं म्हटलं जातं. गिलने हेडला बाद करण्यासाठी पुरेसा असलेला क्लिन कॅच तर पकडला मात्र लगेच त्याने बॉल जमिनीवर टाकून दिल्याने त्याला वॉर्निंग देण्यात आली.