IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. यातील चौथा सामना हा मँचेस्टर येथे 23 जुलै पासून खेळवला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना हा भारताने तर दोन सामने हे इंग्लंडने जिंकले. ज्यामुळे इंग्लंडने सीरिजमध्ये 1-2 ने आघाडी घेतली आहे. सीरिजमध्ये इंग्लंडशी बरोबरी साधायची असेल तर टीम इंडियाला मँचेस्टर येथे होणारा चौथा सामना काहीही करून जिंकावा लागेल. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) दुखापतीचं ग्रहण लागलं असून जवळपास 4 खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. तेव्हा बुधवार पासून सुरु होणाऱ्या चौथ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.
मँचेस्टर टेस्टपूर्वी टीम इंडियातील अनेक खेळाडू दुखापतींनी संघर्ष करत आहेत. ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप, अर्शदीप हे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. नितीश कुमार रेड्डीला दुखापत झाल्यामुळे तो सीरिजमधून बाहेर पडलाय. तर त्याऐवजी अंशुल कंबोजला कव्हर गोलंदाज म्हणून बोलवण्यात आलं आहे. ऋषभ पंतच्या हाताला सुद्धा दुखापत झाली होती, ज्यामुळे तो लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात विकेटकिपिंग करू शकला नाही, तसेच फलंदाजी करताना सुद्धा वेदनेत दिसत होता. त्यामुळे त्याच्या पुढील सामन्यातील खेळण्यावर प्रश्नचिन्ह होतं, परंतु मंगळवारी तो विकेटकिपिंगचा सराव करताना दिसला. त्यामुळे तो चौथ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियाचा भाग असेल अशी शक्यता आहे. आकाशदीप आणि अर्शदीप या दोघांना झालेली दुखापत अद्याप बारी झाली असून ते चौथ्या सामन्यात खेळण्यास असक्षम असतील. त्याऐवजी अंशुल कंबोज याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेड कोच गौतम गंभीरने पूर्वीच स्पष्ट केलं होतं की, वर्क लोड मॅनजेमेंटमुळे बुमराह 5 सामन्यांच्या सीरिजमधील फक्त 3 सामने खेळेल. यापैकी लीड्स आणि लॉर्ड्स टेस्ट सामन्यात बुमराहचा प्लेईंग 11 मध्ये सहभाग करण्यात आला होता. आता सीरिजमधील दोन सामने शिल्लक असल्याने तो दोन्ही पैकी कोणता सामना खेळणार याबाबत शंका होती. मात्र टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, 'जस्सी भाई चौथ्या सामन्यात खेळणार, जेवढं मला माहित आहे'. त्यामुळे बुमराह चौथ्या टेस्ट सामन्याच्या प्लेईंग 11 चा भाग असेल हे जवळपास निश्चित आहे.
हेही वाचा : ऋषभ पंत चौथ्या टेस्टमध्ये विकेटकीपिंग करणार की नाही? व्हायरल व्हिडीओतून उत्तर मिळालं
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव/शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अंशुल कंबोज