Ind vs Eng Manchester Test Ben Stokes On Offer To Team India: भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या तेंडुलकर-अँडरसन चषक स्पर्धेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आलं. मात्र हा सामना अनिर्णित राहणार हे निश्चित होण्याच्या काही ओव्हर आधी मैदानात मोठा राडा झाला. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा 89 धावांवर नाबाद खेळत होता तर वॉशिंग्टन सुंदर 80 धावांवर नाबाद होता. सामन्यातील शेवटच्या दिवसाचं शेवटचं सत्र सुरु होण्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मँचेस्टर कसोटीमध्ये समेट करण्याचा निर्णय घेतला. त्याने रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टनकडे हात मिळवणीची मागणी करत शेवटच्या सत्राआधीच सामाना अनिर्णित सोडूयात अशी मागणी केली. मात्र भारतीय फलंदाजांनी त्याला स्पष्ट नकार दिला. सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत जे काही घडले त्याबद्दल सामन्यानंतर स्ट्रोक्सने स्पष्टीकरण दिले. स्ट्रोक्सचा मैदानामध्येच सामना शेवटच्या सत्राआधी थांबवण्यावरुन रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशी वाद झाला.
बेन स्टोक्सने मैदानावरील पंच रॉड टकर आणि अहसान रझा यांच्याबरोबर दोन्ही फलंदाज सुंदर आणि जडेजा यांच्याशी संपर्क साधून शेवटच्या सत्रातील खेळ होण्याआधीच खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामन्याची अवस्था पाहता फक्त एकच निकाल शक्य होता, तो म्हणजे कसोटी अनिर्णीत राहणे. मात्र भारताने स्ट्रोक्सची ही ऑफर नाकारली. भारताचे दोन्ही फलंदाज शतकांच्या जवळ असल्याने भारताने नकार देणं सहाजिक होतं. आधीच जडेजा आणि सुंदरने चिवट फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. अशातच भारताने सामना मध्येच सोडण्याचा निर्णयही नाकारल्याने स्ट्रोक्स चांगलाच संतापला.
भारताने कसोटीतील शेवटचं सत्र खेळण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्याने स्ट्रोक्स चिडला. मैदानातच स्टोक्सने जडेजाला “तुम्हाला हॅरी ब्रूकच्या गोलंदाजीवर शतक करायचे आहे?” असा खोचक प्रश्न विचारला. इंग्लंडच्या कर्णधाराने त्यानंतर संघाच्या अनुभवी आणि महत्त्वाच्या गोलंदाजांना आराम दिला आणि उर्वरित सामन्यात ब्रूक आणि जो रूट यांनी गोलंदाजी केली. हा सारा प्रकार 138 व्या ओव्हरमध्ये घडला. त्यानंतर पुढे पाच ओव्हर झाल्या आणि दोन्ही संघांनी सामना अनिर्णित म्हणून सोडून दिला. दरम्यान, या पाच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांनी त्यांचे शतक पूर्ण केले. त्यानंतर अखेर दोन्ही संघांनी हातमिळवणी केली आणि मँचेस्टर कसोटी अनिर्णीत संपली.
सामना संपल्यानंतर मैदानामधील या राड्याबद्दल बोलताना बेन स्टोक्सने जडेजा आणि सुंदर यांच्याशी संपर्क साधून कसोटी मध्येच सोडण्याच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण दिलं. खेळ संपल्यात जमा आहे असं निश्चित झाल्यानंतर मला माझ्या गोलंदाजांना जास्त वेळ गोलंदाजी करु द्यायची नव्हती, असं स्ट्रोक्सने स्पष्ट केलं.
“मला वाटते की, भारताने कठोर परिश्रम केले. दोघेही (जडेजा आणि वॉशिंग्टन) अविश्वसनीयपणे चांगले खेळले. मी अशा टप्प्यावर पोहोचलो जिथे फक्त एकच निकाल दिसत होता आणि एक सामना बाकी असताना दुखापतींमुळे मी माझ्या कोणत्याही मोठ्या वेगवान गोलंदाजांना धोका पोहोचेल असं काही करण्याच्या मनस्थितीत नव्हतो,” असे स्टोक्सने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितले.
“लियाम डॉसनने या सामन्यात बरीच षटके टाकली आहेत. तो थोडा थकला होता. त्याला पायात क्रॅम्प्स येऊ लागले, म्हणून मी जे काही घडलं त्यापूर्वीच्या अर्ध्या तासात आणि नंतरही माझ्या कोणत्याही आघाडीच्या गोलंदाजांना धोका पत्करण्यास तयार नव्हतो,” असं ब्रेन स्ट्रोक्सने सामना अर्ध्यात सोडण्यामागील तर्काबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलं.
Ben Stokes & England Cricket Team were absolute SHAME today
— Flt Lt Anoop Verma (Retd.) (@FltLtAnoopVerma) July 27, 2025
They offered draw just to deny 100s to Jadeja & Sundar
When they refused, they started 3rd grade sledging
Cricket is shamed
Sports are shamed@ECB_cricket is shamedpic.twitter.com/Qwpo7TDpYY
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पाचव्या विकेटसाठी 203 धावांची नाबाद भागीदारी केली. सुंदरने त्याचे पहिले कसोटी शतक नोंदवले तर जडेजाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिले शतक स्वत:च्या नावावर केले. “वॉशिंग्टन आणि जडेजा ज्या परिस्थितीत मैदानात आले जेव्हा ते खूप दबावाखाली होते. ते दोघेही टिकून खेळले याचे खूप श्रेय त्यांना द्यावे लागेल,” असे इंग्लंडचा कर्णधार म्हणाला.
स्टोक्सने भारतीय संघाचे कौतुक केले की त्यांनी कठोर प्रयत्न केले आणि गोलंदाजांना विकेटपासून दूर ठेवले. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी इंग्लंडकडे आहे आणि ओव्हलमध्ये आता भारताला मालिका अनिर्णित ठेवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.