Gautam Gambhir On Ben Stokes Handshake Drama: भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळवण्यात येत असलेल्या अँडरसन-तेंडुलकर स्पर्धेमधील मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या मिनिटांत इंग्लंडचा कर्णधार ब्रेन स्टोकबरोबरच इतर खेळाडू आणि भारताच्या रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांच्यात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. इंग्लंडचे 11 खेळाडू विरुद्ध भारताचे दोघे असे 13 जण पंचांसमोरच आमने-सामने आले ते बेन स्ट्रोकच्या एका खोडीमुळे! भारतीय फलंदाजांनी बेन स्टोकने दिलेला सामना अनिर्णित ठेवण्याचा प्रस्ताव फेटाळत शतक पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं. पाच सत्रे खेळून काढण्याचं आव्हान समोर असतानाच भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी करत दिवसभर किल्ला लढवला. खडतर प्रयत्नानंतर या दोन्ही भारतीय फलंदाजांनी कष्टाने भारतीय डावाला आकार दिला. यादरम्यान दोघेही आपआपल्या शतकांच्या जवळ पोहोचल्यानंतर, त्यांनी सामना शतकं झळकावण्यापूर्वी सोडण्यास नकार दिला. ज्यामुळेचं इंग्लंडचा कर्णधार चांगलाच चिडला. त्यानंतर मैदानावर जोरदार वाद झाला आणि सामन्यातील शेवटच्या काही मिनिटांमध्ये मैदानातील वातावरण चांगलेच तापले.
इंग्लंडच्या खेळाडूंनी जडेजाला स्लेज करण्याचा त्याला चिथवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने खणखणीत षटकार लगावत शतक झळकावलं. त्यापाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरनेही एकाच ओव्हरमध्ये तीन चौकार लगावत भरभर 80 वरुन 92 आणि तिथून पुढे तीन आकडी संख्या गाठत कसोटीमधील आपलं पहिलं शतक झळकावलं. दोन्ही फलंदाजांनी शतके झळकावल्यानंतर भारतीय फलंदाजांनी हस्तांदोलन करत सामना अनिर्णित राहणार यावर शिक्कामोर्तब केलं. सामना संपल्यानंतर या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना भारतीय कर्णधार शुभमन गिलने दोन्ही खेळाडूंना पाठिंबा देत तीन आकडी धावसंख्या गाठणे हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगितले, तर स्टोकने त्यांच्या गोलंदाजांना अधिक दुखापत होऊ नये म्हणून सामना लवकर संपवायचा होता, अशी सारासार केली.
सामान्यपणे शब्दांच्या माध्यमातून उत्तर न देता कामगिरीमधून बोलणारा भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर मात्र मैदानातील या साऱ्या राड्यावरुन चांगलाच संतापला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बेन स्ट्रोकनं कारण नसताना उतरुन काढलेल्या या हस्तांदोलन वादाबद्दल गंभीरला विचारण्यात आलं. त्यावेळी गंभीरने अगदी थेट शब्दांमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजाचे समर्थन करताना त्यांनी योग्यच भूमिका घेतल्याचं सांगितलं. गंभीरने आपल्या खास शैलीत, इंग्लंडच्या संघालाच प्रश्न विचारले. त्यांच्यापैकी एखाद्याने पहिल्या कसोटी शतकाचा पाठलाग केला असता तर त्यांचे फलंदाज काही वेगळे वागले असते का? असा थेट सवाल गंभीरने इंग्लंडच्या संघाला विचारलाय.
“जर कोणी 90 धावांवर फलंदाजी करत असेल आणि दुसरा 85 धावांवर फलंदाजी करत असेल, तर ते शतकं झळकवण्यासाठी पात्र नाहीत का?” असा प्रश्न गंभीरने विचारला आहे. “ते (इंग्लंडचे खेळाडू) खरंच असे निघून गेले असते का? जर इंग्लंडचा एखादा फलंदाज 90 किंवा 85 धावांवर फलंदाजी करत असेल आणि त्याला त्यांचे पहिले कसोटी शतक झळकावण्याची संधी मिळाली असती, तर तुम्ही त्याला शतक झळकावून देणार नाही का?” असा सवाल गंभीरने उपस्थित केला. भारताच्या जागी इंग्लंडचा संघ असता तर त्यांनी खरंच आता त्यांना जे अपेक्षित होतं तसं केलं असता का? असा गंभीरच्या प्रश्नांचा ओघ दिसून आला.
Ben Stokes & England Cricket Team were absolute SHAME today
— Flt Lt Anoop Verma (Retd.) (@FltLtAnoopVerma) July 27, 2025
They offered draw just to deny 100s to Jadeja & Sundar
When they refused, they started 3rd grade sledging
Cricket is shamed
Sports are shamed@ECB_cricket is shamedpic.twitter.com/Qwpo7TDpYY
सुंदरने मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याचे पहिले कसोटी शतक पूर्ण केले. या डावखुऱ्या फलंदाजाने जडेजापाठोपाठ वैयक्तिक स्तरावर तीन आकडी धावासंख्या गाठल्यानंतर लगेचच दोन्ही संघांनी हस्तांदोलन करत सामना अनिर्णित राहील यावर शिक्कामोर्तब केलं. “पाहा, हे त्यांचे काम आहे. जर त्यांना असे खेळायचे असेल तर ते त्यांचं त्यांना ठाऊक. मला वाटते की ते दोघेही शतकांसाठी पात्र होते आणि त्यांनी ते मिळवलं,” असं गंभीर पुढे म्हणाला.