Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'मूर्खपणाचा...', रडीचा डाव खेळणाऱ्या स्ट्रोकला नासिर हुसैननेच झापलं! जडेजा, सुंदरची शतकं रोखण्याच्या प्लॅनवरुन...

Ind vs Eng Nasser Hussain Slams Ben Stokes: इंग्लंडच्या माजी कर्णधाराने चौथी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताची बाजू घेत आपल्याच संघाच्या विद्यमान कर्णधाराचा पाणउतारा केलाय. नेमकं घडलंय काय पाहूयात...

'मूर्खपणाचा...', रडीचा डाव खेळणाऱ्या स्ट्रोकला नासिर हुसैननेच झापलं! जडेजा, सुंदरची शतकं रोखण्याच्या प्लॅनवरुन...

Nasser Hussain Slams Ben Stokes: इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने मँचेस्टरमधील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्ट्रोकवर निशाणा साधला आहे. बेन स्ट्रोकचं वागणं हे मूर्खपणाचा असल्याचं अधोरेखित करताना कठोर शब्दांमध्ये आपल्याच राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला नासिरने झापलं आहे. भारताचे दोन्ही अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी चिवट फलंदाजीच्या मदतीने इंग्लंडला सामना जिंकू न देता तो अनिर्णित ठेवत नैतिक विजय मिळवला. चौथा सामना अनिर्णित राहिल्याने आता पाचवा सामना निर्णयाक ठरणार आहे. 

मैदानात शेवटच्या काही मिनिटांमध्ये राडा

जडेजा 89 धावांवर आणि सुंदर 80 धावांवर असताना, इंग्लंडने खोडसाळपणा केला. खरं तर शतकवीर शुभमन गिल आणि केएल राहुल यांना बाद केल्यानंतर मँचेस्टरमध्ये सामना जिंकून अशी अपेक्षा इंग्लंडला होती. मात्र जडेजा आणि सुंदरने 200 हून अधिक धावांची भागिदारी केल्याने त्यांच्या या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलं. सामना अनिर्णित राहणार हे लक्षात आल्यानंतर शेवटचं सत्र खेळूयाच नको अशी ऑफर घेऊन इंग्लंडचा कर्णधार स्टोक दोन्ही भारतीय फलंदाजांकडे गेला आणि हस्तांदोलन करून सामना अनिर्णित राहील असं मानून सोडून देऊयात अशी ऑफर दिली. 

मैदान सोडण्यास नकार आणि बाचाबाची

पण जडेजा किंवा सुंदर दोघांनाही मैदान सोडून जाण्यास नकार दिला. दोघेही अगदी शतकाच्या जवळ असल्याने त्यांनी वैयक्तिक अचिव्हमेंटचा विचार करत सामना असा सोडणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे स्टोक संतापला. त्याने पार्ट-टाइमर हॅरी ब्रूकच्या गोलंदाजीवर तुला शतक करायचं आहे का? असा सवाल जडेजाला विचारत बाचाबाची केली. त्यानंतर स्ट्रोकने खरोखरच ब्रुककडे चेंडू सोपावला. ब्रुकनेही उगाच करायची म्हणून गोलंदाजी केली. मात्र शतकावर ठाम असलेल्या जडेजाने काही वेळातच कारकिर्दीमधील पाचवे शतक पूर्ण केले. पुढील दोन ओव्हरमध्ये सुंदरने कसोटीमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. दोघांनाही शतक झळकावल्यानंतर भारताने हस्तांदोलनाची तयारी दर्शवली आणि सामना अनिर्णित राहिला.

नक्की वाचा >> 'त्या दोघांवर...' इंग्लंडच्या रडीच्या डावानंतर गिलने बेन स्ट्रोकची 'ती' ऑफर का नाकारली स्वत: सांगितलं

दोघेही या शतकांसाठी पात्र

मात्र इंग्लंडच्या संघाने खेळाडूवृत्ती दाखवण्याऐवजी शेवटच्या क्षणी घातलेल्या गोंधळावरुन अनेकांनी आक्षेप नोंदवत इंग्लंडच्या संघावर टीका केली आहे. 'स्काय क्रिकेट'शी बोलताना माजी कर्णधार नासिर हुसैननेही जडेजा आणि सुंदर त्यांच्या शतकांसाठी खेळले यात मला काही चुकीचं वाटत नाही असं मत नोंदवलं. खरोखरच हे दोघेही या शतकांसाठी पात्र होते, असंही हुसैन म्हणाला. 

थोडा मूर्खपणाचा निर्णय

“मला त्यात कोणतीही अडचण वाटत नव्हती. इंग्लंडला यात अडचण वाटत होती कळेना! ते थोडे थकले होते. त्यांचे गोलंदाजही थकले होते. त्यांना मैदानातून बाहेर पडायचे होते. मात्र भारताच्या दोन्ही खेळाडूंनी 80 धावांपर्यत मजल मारण्यासाठी कठोर परिश्रम केलेलं. त्यांना कसोटी सामन्यातील शतकांची आस होती. स्टोकला संपूर्ण सामन्यामध्ये ब्रूककडून गोलंदाजी करावी लागली नाही. मात्र सामन्याच्या शेवटाकडे स्टोकचा तो निर्णय थोडा मूर्खपणाचा वाटला. ते (भारतीय फलंदाज) चांगले खेळले. ते ड्रॉसाठी पात्र ठरता येईल असे खेळले, ते दिवसाच्या शेवटी सामन्याच्या जो निकाल लागला तो करण्यास पात्र होते,” असं हुसैन म्हणाला.

भारताचं तोंडभरुन कौतुक

हुसैनने दुसऱ्या डावातील खेळासाठी भारताचे तोंडभरुन कौतुक केले. चौथ्या दिवशी शून्य धावांवर 2 बाद अशा भयानक सुरुवातीनंतर भारताना सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. दोन विकेट्स गेल्यानंतर गिल आणि राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली, त्यानंतर जडेजा आणि सुंदर यांनी कसोटी अनिर्णित राहील यावर शिक्कामोर्तब करताना नाबाद राहत 200 हून अधिक धावांची भागिदारी करतानाच आपआपली शतकं पूर्ण केली. 

सर्व श्रेय भारताचेच

“सर्व श्रेय भारताला जाते. या बेझबॉलच्या युगात हा इंग्लंडचा हा दुसराच अनिर्णित सामना आहे. या मैदानावर पावसामुळे एकदा सामना अनिर्णित ठरला होता. इंग्लंडला दोन डावखुऱ्या फलंदाजांना बाद करता आले नाही म्हणून हा सामना अनिर्णित राहिला हे उत्तम आहे,” असंही नासिर हुसैन म्हणाला.

Read More