Ind vs Eng: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान ड्युक्स बॉल हा चर्चेचा विषय राहिला आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी चेंडू फार लवकर मऊ म्हणजेच सॉफ्ट होतो अशी तक्रार केली आहे. लॉर्ड्समधील सामन्यादरम्यान तर खूप मोठा वाद झाला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन वेळा चेंडू बदलण्यात आला होता. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, मालिकेतील चेंडू बदलण्याच्या पद्धतीवर नाराज असल्याने पाहुण्या संघाने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) नेलं आहे.
रिपोर्टनुसार, दुसरा चेंडू ज्याचा फक्त 10 ओव्हर्सनंतर आकार बदलला होता तो जवळपास 30 ते 35 ओव्हर्स जुना होता. "नियमानुसार बदली केल्यानंतर मिळणारा चेंडू मूळ चेंडूइतकाच जुना असावा. परंतु अम्पायर्सनी संघाला 10 ओव्हर्स जुना चेंडू स्टॉकमध्ये नाही असं सांगितलं होतं," असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. भारतीय संघाला एका कठीण चेंडूऐवजी जुना चेंडू सामन्यात त्यांचं नुकसान झालं असं वाटत आहे. या सामन्यात भारताला 22 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
"लॉर्ड्समध्ये, सुमारे 10 ओव्हर्सनंतर ड्यूक्स बॉलने त्याचा आकार गमावला, जे मालिकेत वारंवार घडलं आहे. चेंडू एकसारखा गोलाकार आहे की नाही हे तपासण्यासाठी पंच मैदानावर घेऊन आलेल्या रिंगमधून चेंडू जाऊ शकला नाही. तथापि, अम्पायर्सकडे 10 ओव्हर्स जुना चेंडू नव्हता, म्हणून सामन्याच्या एका महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघाला 30 ते 35 ओव्हर्स जुना चेंडू मिळाला," असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, जर भारतीय संघाला बदली चेंडू 30 ते 35 ओव्हर्स जुना असल्याचं समजलं असतं तर ते नव्या चेंडूसाठी ठाम राहिले असते. "जेव्हा तुम्ही चेंडू बदलण्याची विनंती करता तेव्हा तुम्हाला बदली चेडूं किती जुना आहे याबद्दल सांगितलं जात नाही. लॉर्ड्समध्ये आम्हाला सांगितले गेलं नव्हतं की बदली चेंडू 30 ते 35 ओव्हर्सचा असेल. जर आम्हाला सांगितले गेलं असतं, तर आम्ही 10 ओव्हर्स वापरलेल्या विकृत चेंडूने खेळत राहिलो असतो. आयसीसीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. हा नियम बदलण्याची गरज आहे," असं अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
ESPNcricinfo ने नुकताच एक रिपोर्ट शेअर केला आहे, ज्यामध्ये सरासरी स्विंग आणि दुसऱ्या नवीन चेंडूच्या स्विंगची तुलना केली आहे. "दुसरा नवीन चेंडू... सरासरी 1.869 अंशांनी स्विंग झाला आणि 0.579 अंशांनी सीम झाला. बदली चेंडू सरासरी 0.855 अंशांनी स्विंग झाला आणि 0.594 अंशांनी सीम झाला," असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
"मी काहीही आरोप करत नाहीये पण जेव्हा आम्ही गडद चेंडू मागितला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की इंग्लंडने त्यांचा दुसरा नवीन चेंडू म्हणून हा चेंडू निवडला होता," असे अधिकाऱ्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला की मॅच रेफ्रीचा सहभाग नसल्यामुळे घरच्या संघाकडून या प्रणालीमध्ये सहज फेरफार केला जाऊ शकतो. "योग्य गोष्ट म्हणजे ही चेंडू निवड मॅच रेफ्रींच्या खोलीत करावी, ड्रेसिंग रूममध्ये नाही तर स्थानिक पंच एकमेव अधिकारी उपस्थित राहून करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.