Oppose To Shubman Gill As India new Test captain: भारताचा कसोटी संघ कात टाकणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूंनी एकामागोमाग एक निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता संघात जास्त अनुभव असणारे खेळाडू उतरलेले नाहीत. विराट आणि रोहितपूर्वी रविचंद्रन अश्विननेही कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याने आता संघाची धुरा कोणाकडे सोपवायची याबद्दल निवड समितीमध्येच संभ्रम असल्याचं दिसत आहे. अनेक वेबसाईट्सने दिलेल्या वृत्तानुसार, शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीमध्ये शुभमनचं नाव आघाडीवर असून तोच इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाचं नेतृत्व करेल असं चित्र पाहायला मिळत आहे.
मात्र आता शुभमनच्या संभाव्य कर्णधारपदाला विरोध होताना दिसत आहे. 1983 ला भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग असलेल्या कृष्णमचारी श्रीकांत यांनी शुभमनला कर्णधार बनवण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. शुभमन गिलला कसोटीमधील अनुभव नसल्याने तसेच त्याच्याकडे नेतृत्व गुणांचा आभाव असल्याने कर्णधार म्हणून विचार करु नये असं श्रीकांत यांनी म्हटलं आहे. तसेच परदेश दौऱ्यांचाही शुभमनला अनुभव नसल्याचा मुद्दाही श्रीकांत यांनी मांडला आहे.
गीलवर विश्वास ठेऊ नका त्याच्याऐवजी संघातील इतर खेळाडूंचा कर्णधार म्हणून विचार कसा असा सल्ला श्रीकांत यांनी निवड समितीला दिला आहे. "त्याचं स्वत:चं कसोटीमधील स्थान निश्चित नाही. कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवलं पाहिजे. तो कोणत्याही सामन्यासाठी उपलब्ध नसेल किंवा तंदुरुस्त नसेल तर के. एल. राहुलकडे अथवा ऋषभ पंतकडे सोपवलं पाहिजे. या तिघांपैकीच कोणीतरी नेतृत्व केलं पाहिजे," असं श्रीकांत यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मूळचा पंजाबचा असलेला शुभमन गिल गुजरात टायटन्सच्या संघाचं नेतृ्त्व करतोय. शुभमन भारताच्या टी-20 च्या संघाचा कर्णधारही राहिला आहे. मात्र त्याच्या कसोटीमधील कारकिर्दीबद्दल आजही शंका घेण्यास वाव असल्याचं आकडेवारी दर्शवते. यशस्वी जयसवालला सलामीवीर म्हणून पदार्पणापासून संधी देण्यात आल्यानंतर शुभमन स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. मात्र त्याला तिसऱ्या क्रमांकावर आपल्या फलंदाजीची चमक दाखवता आलेली नाही.
2024-25 च्या बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेमध्ये शुभमनने 93 धावा केल्या. पाच खेळींमध्ये 18.60 च्या सरासरीने केलेली ही कामगिरी पाहून त्याला मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीसाठी संघातून वगळण्यात आलं. परदेशातील मालिकांमध्ये शुभमन गिलला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड दौऱ्याही शुभमन अपयशी ठरला.
दुसरीकडे जसप्रीत बुमराह हा कसोटी क्रिकेटमधील विश्वासू खेळाडू म्हणून मागील काही काळात नावारुपास आला आहे. बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमध्ये बुमराहने दोन कसोटी सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटीमध्येही बुमराहने कर्णधार पद भुषवलेलं. श्रीकांत यांनी बुमराह हा कर्णधार म्हणून सध्याच्या काळात अधिक योग्य ठरेल. मात्र दुखापतीमुळे तो संघाबाहेर राहणार असेल तर कर्णधारपद के. एल. राहुल किंवा ऋषभ पंतकडे सोपवली पाहिजे. या दोघांकडेही कसोटीचा आणि कर्णधारपदाचा चांगला अनुभव असल्याचं श्रीकांत यांचं म्हणणं आहे.
कोहलीची जागा फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये कोणी घेतली पाहिजे याबद्दलही श्रीकांत यांनी भाष्य केलंय. "भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी केली पाहिजे याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते के. एल. राहुलला हे स्थान दिलं पाहिजे. कसोटी क्रिकेटचा विचार केल्यास तो उत्तम पर्याय आहे. त्याचं तंत्र उत्तम असून व्यवस्थापनाने त्याला ठराविक भूमिका दिली पाहिजे," असं श्रीकांत म्हणाले.