Abhimanyu Easwaran Father Statement: इंग्लंड विरुद्ध भारताची पाचवी टेस्ट सुरु झाली आहे. प्रत्येक टेस्टच्या आधी संघात कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष होतं. पण एक खेळाडू इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच बसून राहिला, त्याला पाचव्या कसोटीतही प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग पाचव्या सामन्यातही अभिमन्यू ईश्वरनला संधी न दिल्यामुळे त्याच्या वडिलांचा संयमाचा बांध अखेर फुटला आहे. टीम मॅनेजमेंटवर नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अभिमन्यू ईश्वरनचा इंग्लंड दौरा संपूर्णपणे बेंचवर बसूनच गेला. पाच कसोट्यांपैकी एकाही सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं नाही. त्याचे वडील रंगनाथन ईश्वरन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की, “मी दिवस नाही, तर तीन वर्षांपासून मुलाच्या टेस्ट डेब्यूची वाट पाहतो आहे. आता तो मानसिकदृष्ट्या थोडा खचलेला आहे.”
रंगनाथन यांनी प्रश्न उपस्थित केला की, “काही खेळाडूंना फक्त IPL च्या कामगिरीवरून कसोटी संघात संधी कशी मिळते? कसोटी संघासाठी निवड करताना रणजी ट्रॉफी, दलीप ट्रॉफी आणि ईरानी ट्रॉफी या स्पर्धांचा विचार होणं आवश्यक आहे.” त्यांनी अभिमन्यूच्या कामगिरीचा उल्लेख करत सांगितलं की, “गेल्या वर्षभरात त्याने सुमारे 864 धावा केल्या आहेत. तो दलीप ट्रॉफी आणि ईरानी ट्रॉफीमध्ये सातत्याने खेळला आणि उत्तम खेळ दाखवला. तरीही त्याला संधी नाकारण्यात आली.”
ईश्वरनच्या वडिलांनी करुण नायरला मिळालेल्या संधीवरही नाराजी व्यक्त केली. “करुण नायर गेल्या वर्षी दलीप किंवा ईरानी ट्रॉफीसाठी खेळलाच नाही. तरीही त्याला संघात स्थान मिळालं. चांगलं आहे, त्याने 800+ धावा केल्या असतील. पण अभिमन्यूनेही काही कमी केलं नव्हतं.”
“माझा मुलगा संघात स्थिर राहून मेहनत करत आहे. तरीही त्याला डावललं जातंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची दोन इनिंग्स फारशा चांगल्या गेल्या नाहीत, हे मान्य. पण त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवलं. तरी त्याला डावललं जातं, यामागचं लॉजिक मला समजत नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.
इंग्लंड दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच आपण मुलाला सतत प्रोत्साहित करत होतो, असं सांगताना त्यांनी भरल्या आवाजात म्हटलं “तो डिप्रेशनमध्ये आहे हे स्पष्ट जाणवतंय. त्याच्यासारख्या खेळाडूंना संधी न मिळणं म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी मोठं नुकसान आहे.”