Champions Trophy 2025 : आयसीएस चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याने अधिक रंगतदार झाली आहे. आतापर्यंत ग्रुप ए मधून भारत, न्यूझीलंड तर ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया असे तीन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. आता ग्रुप बी मधून फक्त एक संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणे शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकल क्लार्क (Michael Clarke) याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे (Champions Trophy 2025) विजेतेपद कोणता संघ पटकावले याबाबत भविष्यवाणी केली आहे. बियॉन्ड 23 क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना मायकल क्लार्कने ही भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकल क्लार्कने पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद टीम इंडियाच जिंकेल. मायकल क्लार्क म्हणाला, 'मला वाटत की ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात फायनल होईल. मला हवंय की त्यात ऑस्ट्रेलियाने जिंकावं, पण मला असं वाटतंय की फायनल भारतच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार. ते सध्याच्या घडीला वनडे फॉरमॅटमधील जगातील नंबर एकचा संघ आहेत. मला वाटतंय कि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होईल आणि यात भारत एका धावाने जिंकेल'.
हेही वाचा : पृथ्वी शॉ सपना गिल प्रकरणाला वेगळं वळण, FIR रद्द होणार नाही? हायकोर्टाने दिले निर्देश
2023 चा वनडे वर्ल्ड कप फायनल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये झाला होता. यात भारताच्या होम ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. आता दोन्ही संघांमध्ये पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने देखील सेमी फायनलमध्ये एंट्री मिळवली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत ग्रुप ए चा भाग असून यात आतापर्यंत झालेले दोन पैकी दोन सामने भारताने जिंकले आहेत. तर तिसरा सामना भारत 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचा पहिला राउंड हा 4 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारी रोजी पहिला सेमी फायनल सामना दुबईत पार पडेल. तर 5 फेब्रुवारी रोजी दुसरा सेमी फायनल सामना हा पाकिस्तानात खेळवला जाईल. याशिवाय 9 मार्च रोजी फायनल सामना खेळवला जाणार आहे. जर टीम इंडियाने सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना हा दुबईत पार पडेल.
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 2002 आणि 2013 मध्ये भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सुद्धा 2006 आणि 2009 अशा दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.