Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs SA: विराटची अर्धशतकी खेळी; भारताची आफ्रिकेवर ७ गडी राखून मात

विराट कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Ind vs SA: विराटची अर्धशतकी खेळी; भारताची आफ्रिकेवर ७ गडी राखून मात

मोहाली: कर्णधार विराट कोहली याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बुधवारी भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने नाबाद ७२ धावा केल्या. यामुळे विराट कोहली आता सामना जिंकवून देणाऱ्या (मॅच विनिंग) खेळींचा विचार करता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या मॅच विनिंग इनिंग्जमध्ये २४४१ धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम (२४३४ धावा) रोहित शर्माच्या नावावर होता. 

याबरोबरच विराट कोहली एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये ५० पेक्षा अधिक सरासरी राखणारा फलंदाज ठरला आहे. 

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. आफ्रिकेकडून डी-कॉकने ३७ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावा केल्या. मात्र, भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठे फटके खेळायची संधी दिली नाही. त्यामुळे आफ्रिकेला १४९ धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आले. 

यानंतर आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी आश्वासक नव्हती. सलामीवीर रोहित शर्मा (१२)  फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली.

मात्र, डेव्हिड मिलरने घेतलेल्या अफलातून झेलामुळे शिखर धवनाला ४० धावांवर माघारी परतावे लागले. ऋषभ पंतही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरला साथीला घेत आपले अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली. विराट कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Read More