PCB Vs BCCI On PSL: भारत आणि पाकिस्तानदरम्यान सीमाभागामध्ये संघर्ष सुरु आहे. भारताने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करुन 26 पर्यंटकांची हत्या करणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करुन 120 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून देशाच्या सुरेक्षाचा विचार करुन दोन्ही देशांनी आपआपल्या देशात सुरु असलेल्या लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. भारतामध्ये सुरु असलेली इंडियन प्रिमिअर लीग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक आठवडा स्थगित केली आहे तर तिकडे पाकिस्तानमधील पाकिस्तान प्रिमिअर लीग ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध 7 मे रोजी भारताने केलेल्या दहशतवादीविरोधी कारवाईनंतर कामालीचे ताणले गेले असून दोन्ही देशांकडून लष्करी कारवाया सुरु झाल्यानंतर पाकिस्तान प्रिमिअर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आधी पाकिस्तान प्रिमिअर लीग संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला हलवण्याचा विचार केला. मात्र एमिरिट्स क्रिकेट बोर्डाने ही ऑफर फेटाळून लावली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका आठवड्यासाठी इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यांना थांबवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच पाकिस्तानी प्रिमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थागित करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं. मात्र पाकिस्तानची युएईमध्ये स्पर्धा खेळवण्याची मागणी फेटाळून लावण्यामध्ये भारतीय क्रिकेटमधील बड्या नावांचा प्रभाव कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ईसीबीने पाकिस्तान प्रिमिअर लीगला नकार दिला तो भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळेच. ईसीबीकडे पाकिस्तानला नकार द्यावा यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष जय शाह होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र असलेल्या जय शाह यांनी क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानची कोंडी केल्याचं दिसून आलं. यासंदर्भात 'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि ईसीबी या दोघांमधील संबंधांचा संदर्भ देण्यात आला आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये आयपीएलचं जवळपास दीड पर्व दुबईमध्ये खेळवण्यात आलेलं.
"आम्ही बीसीसीआय आणि जय भाईंचं देणं लागतो," असं ईसीबीने 'क्रिकबझ'ला सांगितलं. या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानला नकार देण्यामागे भारतीय कनेक्शन असल्याचं मान्य केलं आहे. बीसीसीआयकडे आयपीएल भारताबाहेर घेण्याइतका निधी सहज उपलब्ध आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे एवढा पैसा नाही ते पाकिस्तान प्रिमिअर लीगचं उर्वरित पर्व परदेशात आयोजित करु शकतात. त्यामुळेच भारताच्या आणि पर्यायाने जय शाहांच्या या खेळीने पाकिस्तानची कोंडी झाली आहे.
पाकिस्तान प्रिमिअर लीगमधील बाद फेरीतील 4 आणि उपांत्य फेरीबरोबरच अंतिम सामना शिल्लक असतानाच स्पर्धा गुंडाळण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. त्यामुळेच एकीकडे अमित शाह गृहमंत्री म्हणून पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाई आणि धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून कठोर भूमिकेत दिसत असतानाच दुसरीकडे त्यांचा मुलगा म्हणजेच जय शाह हे सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानची कोंडी करताना पाहायला मिळत आहेत. पाकिस्तान प्रिमिअर लीगचे उर्वरित सामने न झाल्यास पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला कोट्यवधींचा फटका बसणार आहे.