PSL News India Pakistan War: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरेल मिचेलने पुन्हा कधीच पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतली आहे. क्रिकेट खेळण्यासाठी आपण पुन्हा कधीच पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं डॅरेल मिचेल जाहीर केलं आहे. दुसरीकडे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम करन हा अगदी 'लहान बाळाप्रमाणे रडू' लागल्याची बातमी समोर येत आहे. भारत पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानमधील जवळपास सर्वच विमानतळं बंद करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानी प्रिमिअर लीग स्पर्धेसाठी पाकिस्तानात गेलेले अनेक परदेशी खेळाडू पाकिस्तानात अडकून पडले. भारत-पाकिस्तानदरम्यान युद्ध सुरु असून विमानतळं बंद असल्याचं समजल्यानंतर डॅरेल मिचेल आणि टॉम करन यांची काय अवस्था झाली होती याबद्दल बांगलादेशी फिरकीपटू रशीद हुसैन याने सांगितलं आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी 26 पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने 6 ते 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात 120 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध या कारवाईनंतर कामालीचे ताणले गेले असून दोन्ही देशांकडून लष्करी कारवाया सुरु झाल्यानंतर पाकिस्तान प्रिमिअर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आधी पाकिस्तान प्रिमिअर लीग संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला हलवण्याचा विचार केला. मात्र एमिरिट्स क्रिकेट बोर्डाने ही ऑफर फेटाळून लावली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका आठवड्यासाठी इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यांना थांबवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच पाकिस्तानी प्रिमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थागित करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं.
पाकिस्तान प्रिमिअर लीगमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंना स्पर्धा स्थगित झाल्यानंतर युएईवरुन कनेक्टेड फ्लाइट्सने त्यांच्या त्यांच्या देशांमध्ये पाठवण्यात आलं. बांगलादेशी फिरकीपटू रशीद हुसैन हा या स्पर्धेमध्ये 'लाहोर कलंदर्स'च्या संघातून खेळत होता. ज्या विमानतळावरुन परदेशी खेळाडूंच्या चार्टड विमानाने उड्डाण घेतलं ते विमानतळ पुढल्या 20 मिनिटांमध्ये मिसाईल हल्ल्यात उद्धवस्त झाल्याचं ऐकून आम्हाला सर्वांना मोठा धक्का बसला होता, असं रशीद हुसैनने सांगितलं.
"दुबईमध्ये आमचं विमान उतरल्यानंतर ज्या विमानतळावरुन आम्ही उड्डाण केलं होतं त्या विमानतळावर आम्ही उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटांनी मिसाईल हल्ला झाल्याचं समजलं. ही बातमी आमच्यासाठी फारच धक्कादायक होती. आता दुबईत परतल्याने थोडा दिलासा मिळाला आहे," असं रशीद हुसैन 'क्रिकबझ'शी संवाद साधताना म्हणाला. "मी कुठेही क्रिकेट खेळायला जातो तेव्हा माझ्या कुटुंबाला तेथील परिस्थिती कशी असेल याची चिंता वाटतो. आता त्याना पाकिस्तानमधील बातम्या कळल्या. बॉम्बस्फोट, मिसाईल हल्ल्यांबद्दल कळाल्याने ते चिंतेत आहेत. मी फोन करुन त्यांच्याशी बोललो आणि त्यांना चिंता करु नये असं सांगितल्यावर त्यांना दिलासा मिळाला आहे," असंही रशीद हुसैन म्हणाला.
'लाहोर कलंदर्स'च्या संघातून खेळणारे रशीद हुसैनचा सहकारी डॅरेल मिचेलने पुन्हा कधीच पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतल्याचंही त्याने सांगितलं. "सॅम बिलिंग्स, डॅरेल मिचेल, कुशल परेरा, डेव्हिड विस्ली, टॉम करन यासारख्या परदेशी खेळाडूंची भितीने गाळण उडाली. दुबईमध्ये परतल्यानंतर डॅरेल मिचेलने मला तो यापुढे कधीच पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं सांगितलं. खास करुन अशा परिस्थितीत आपली तेथे जाण्याची इच्छा नाही असं तो मला म्हणाला. ते सर्वचजण खूप घाबरलेले होते," असं रशीद हुसैनने सांगितलं.
टॉम करनबद्दल बोलवताना रशीद हुसैनने, "तो विमानतळावर पोहोचला. मात्र विमानतळ बंद असल्याचं समजल्यानंतर तो लहान मुलासारखा रडू लागला. तीन ते चार जणांनी त्याला धीर दिल्यावर तो शांत झाला," असं सांगितलं.