Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'कदाचित त्याला...', विराटच्या निवृत्तीचं खरं कारण आगरकरनेच सांगितलं; सर्वांसमोर मोठा खुलासा

Ajit Agarkar On Virat Kohli Retirement: इंग्लंडच्या दौऱ्याआधी विराटने अचानक निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा असली तरी यामागील खरं कारण आगरकरने सांगितलं आहे.

'कदाचित त्याला...', विराटच्या निवृत्तीचं खरं कारण आगरकरनेच सांगितलं; सर्वांसमोर मोठा खुलासा

Ajit Agarkar On Virat Kohli Retirement: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांसाठी 18 भारतीय खेळाडूंचा संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने जाहीर केला. कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं असून उपकर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी लागली आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने पत्रकार परिषदेमध्ये संघाची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आगकरने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्तीसंदर्भातील निर्णयावरही भाष्य केलं आहे.

दोघेही फार मोठे खेळाडू...

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला एका आठवड्याच्या आत एकामागोमाग एक निवृत्तीची घोषणा केली. "निवृत्ती घेणं हा खासगी निर्णय असतो. यासंदर्भात तेच आधी आमच्याशी बोलले आणि त्यांनी त्यांचा निर्णय कळवला. निवृत्त व्हावं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. हे दोघेही फार मोठे खेळाडू असून आता त्यांची जागा भरुन काढणं हे आमच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे," असं अजित आगरकर यांनी सांगितलं.

विराटने एप्रिलमध्ये कळवलं होतं

पुढे पत्राकरांकडून पुन्हा एकदा विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी विराटने निवृत्ती नेमकी कोणत्या कारणामुळे जाहीर केली यासंदर्भातील शक्यता व्यक्त केली. विराटने मे महिन्याच्या सुरुवातीला निवृत्ती जाहीर केली असली तरी त्याने निवृत्त होण्यासंदर्भात एप्रिल महिन्यातच बीसीसीआयला कळवलं होतं, असं आगरकरने स्पष्ट केलं.

विराटच्या निवृत्तीचं खरं कारण

विराटच्या निवृत्तीमागील कारणाबद्दलही आगरकरने भाष्य केलं. "विराट कोहलीने एप्रिलमध्येच आमच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळेस त्याने निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कदाचित त्याला असं वाटलं असेल की आपल्याला पूर्ण क्षमतेनं संघासाठी योगदान देता येत नाहीये. निवृत्तीसंदर्भात त्यानेच आमच्याकडे विषय काढला आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान केला," असं आगरकरने सांगितलं.

दोघेही स्वत:शी प्रमाणिक

"एक गोष्ट नक्की आहे की ते (विराट आणि रोहित शर्मा) स्वत:शी प्रमाणिक आहेत. आम्ही नक्कीच त्यांना मिस करु यात शंका नाही. मात्र त्यांचा हा निर्णय म्हणजे इतर कोणातरीसाठी संधी आहे," असंही आगरकर म्हणाला.

असा आहे इंग्लंडच्या दौऱ्यावरील भारताचा संघ -

शुभमन गिल (कर्णधार)
ऋषभ पंत (उपकर्णधार) (यष्टीरक्षक)
यशस्वी जयसवाल
के. एल. राहुल
साई सुदर्शन
अभिमन्यू अस्वर्णा
करुण नायर
नितीश कुमार रेड्डी
ध्रुव जुरैल (यष्टीरक्षक)
वॉशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
प्रसिद्ध कृष्णा
अकाश दीप
अर्शदीप सिंग
कुलदीप यादव

Read More