KL Rahul Records: टीम इंडियाचा स्टार ओपनर केएल राहुल सध्या इंग्लंड दौऱ्यावर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या दौऱ्यात त्याने केवळ एक नव्हे, तर दोन टेस्ट शतकं झळकावून इतिहास घडवला आहे. लॉर्ड्सवर आपल्या बॅटने पुन्हा एकदा कमाल करत राहुलने असं काही केलं आहे, जे आजवर भारतीय क्रिकेटमध्ये फक्त एकदाच घडलं होतं. 2021 मध्ये लॉर्ड्सवर शतक ठोकणारा राहुल आता या ऐतिहासिक मैदानावर पुन्हा एकदा शतकी कामगिरी करत दुसऱ्यांदा सेंच्युरी करणारा फक्त दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी हे यश फक्त 'कर्नल' दिलीप वेंगसरकर यांनी मिळवलं होतं. तेही तब्बल तीन वेळा!
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्ट मालिकेच्या तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (12 जुलै, शनिवार) राहुलने टीम इंडियाच्या पहिल्या डावात ही ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी 53 धावांवर नाबाद असलेला राहुल तिसऱ्या दिवशी अधिक आक्रमक दिसला. त्याने ब्रायडन कार्सच्या एका ओव्हरमध्ये सलग तीन चौकार मारत स्टेडियममध्ये जल्लोष उडवला. पंतसोबत भागीदारी करत भारताला 250 धावांपलीकडे नेणारा राहुल जेव्हा 98 वर होता, तेव्हा लंचपूर्वी शेवटच्या ओव्हरमध्ये पंत रनआउट झाला आणि राहुलला आपला शतक पूर्ण करण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. अखेर दुसऱ्या सेशनच्या सुरुवातीलाच त्याने एक धाव घेत आपल्या टेस्ट कारकिर्दीतील दहावं शतक पूर्ण केलं.
राहुलने या डावात 177 चेंडूत 13 चौकारांसह 100 धावा केल्या. शतक होताच तो फार काळ टिकला नाही आणि शोएब बशीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. तरीही, त्याच्या या खेळीचं महत्त्व अलौकिक आहे. कारण लॉर्ड्ससारख्या मैदानावर दोन वेळा शतक ठोकणं हे भारतीय खेळाडूंसाठी फार दुर्मीळ आहे.
विशेष म्हणजे, राहुलची ही उपलब्धी तितकीच खास आहे कारण क्रिकेट जगतातल्या काही दिग्गज सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना देखील लॉर्ड्सवर एकदाही शतक करता आलं नाही. तिथे राहुलने आता दुसऱ्यांदा शतक करत स्वतःचं नाव लॉर्ड्सच्या ‘ऑनर्स बोर्ड’वर कायमचं कोरलं आहे.
CENTURY for KL Rahul!
— BCCI (@BCCI) July 12, 2025
His 10th HUNDRED in Test Cricket
And 2nd Ton at Lord's
Updates https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND | @klrahul pic.twitter.com/vFDNhWsnH5
हे लक्षात घेतलं पाहिजे की इंग्लंडच्या याच दौऱ्यात राहुलने लीड्समध्येही एक दमदार शतक ठोकलेलं आहे. म्हणजेच एकाच मालिकेत त्याचे दोन शतकं झाली आहेत. जे त्याच्या सातत्याचं मोठं उदाहरण आहे.