भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो असं भाकीत माजी खेळाडू मोहम्मद कैफने वर्तवलं आहे. इंग्लंड मालिकेतील त्याचा संघर्ष आणि वर्कलोड पाहता तो निवृत्ती घेईल असा अंदाज मोहम्मद कैफने वर्तवला आहे. बुमराहने इंग्लंडविरोधातील मालिकेत आतापर्यंत 13 विकेट्स घेतल्या आहे. मॅनचेस्टर कसोटी सामन्यात तो शॅडो खेळाडूप्रमाणे खेळत आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत मोहम्मद कैफने आता भारतीय संघाने कसोटीत बुमराहविना खेळण्याची सव लावून घ्यायला हवी असं सांगितलं आहे. दरम्यान अँडरसन-तेंडुलकर मालिका सुरु होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने जसप्रीत बुमराह पाचपैकी फक्त तीन कसोटी सामने खेळेल असं स्पष्ट केलं होतं.
"जसप्रीत बुमराह, मला वाटत नाही की आता तुम्ही त्याला आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळताना पाहू शकाल. तो कदाचित निवृत्तीही जाहीर करु शकतो. तो सध्या शरिरासोबत संघर्ष करत आहे. त्याच्या शरिराने आता हात टेकले आहेत. मॅनचेस्टर सामन्यात त्याचा वेगही मंदावला आहे. त्याच्याकडे काहीच गती दिसत नाही आहे," असं मोहम्मद कैफने म्हटलं आहे.
जर बुमराहने आपली कामगिरी अपेक्षित नाही असं वाटलं तर तो स्वत:हून कसोटीमधून माघार घेईल असा विश्वासही कैफने व्यक्त केला आहे. "तो फार निस्वार्थी व्यक्ती आहे. जर त्याला आपण देशासाठी 100 टक्के देण्यात असमर्थ ठरत आहोत, सामना जिंकून देण्यात कमी पडत आहोत, विकेट मिळत नाही आहेत असं वाटलं तर स्वत:हून खेळण्यास नकार देईल. माझे अंतर्मन मला हे सांगत आहे," असं त्याने म्हटलं आहे.
दुसऱ्या सत्रात बुमराह घोट्याला पकडताना दिसला तेव्हा चिंता आणखी वाढली. तो दिवसाच्या शेवटी गोलंदाजी करण्यासाठी परतला होता. समालोचकांनीही तो स्वतःला रोखून ठेवत होता, आणि काळजीपूर्वक खेळपट्टीवर येत होता असं मत नोंदवलं. वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराह पाचपैकी फक्त तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार असल्याने, कैफने सुचवले चाहत्यांना भविष्यात त्याला कसोटीत न खेळताना पाहण्याची सवय करावी लागेल असंही सांगितलं आहे.
"त्याच्या पॅशन आणि कटिबद्धतेबद्दल शंका नाही. पण आता त्याचं शरीर थकत चाललं आहे. या कसोटीतील त्याची कामगिरी स्पष्टपणे दर्शवते की त्याला पुढे कसोटी सामने खेळण्यास अडचणी येतील आणि कदाचित तो कसोटीत खेळणार नाही. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विननंतर, भारतीय चाहत्यांना बुमराहशिवाय खेळण्यासाठी स्वतःला तयार करावे लागेल. मला आशा आहे की माझा अंदाज चुकीचा ठरेल, परंतु मी जे पाहिले तेच मी बोलत आहे," असं मत त्याने मांडलं आहे.