Mohammes Siraj Winning Moment: अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराज हिरो ठरला आहे. अखेरच्या सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडच्या तोंडता घास हिरावला आणि मालिका अनिर्णित राखली. सामन्यानंतर मोहम्मद सिराजने पाचव्या दिवशी गोलंदाजी करताना आपण नेमकी कुठून प्रेरणा घेतली याचा खुलासा केला आहे. चौथ्या दिवशी एक झेल सोडल्याने मोहम्मद सिराज टीकाकारांच्या निशाण्यावर होता. पण पाचव्या दिवशी आपल्या खेळीने त्याने सर्वांना शांत केलं.
पाचव्या दिवशी इंग्लंड संघाला फक्त 35 धावांची गरज असताना आणि 4 विकेट्स हाती असताना ते सहजपणे जिंकतील असं वाटत होतं. दरम्यान सिराजने सांगितलं की, मी सकाळी उठल्यावर गुगलला Self Believe नावाने फोटो शोधला होता. तो पाहिल्यानंतर मला आपण जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला आणि त्यानुसारच खेळी केली. मी काहीही वेगळं न करता विकेटमध्ये गोलंदाजी करत होतो असं त्याने सांगितलं. तसंच त्याने विजयात सर्वांचं योगदान असल्याचं म्हटलं आहे.
— ICC (@ICC) August 4, 2025
ओव्हल कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली. पण झेल सोडल्यानंतर त्याच्यावर दबाव आला होता. त्याने चौथ्या दिवशी हॅरी ब्रूकला फक्त 19 धावांवर असताना जीवनदान दिलं होतं. त्यानंतर ब्रूकने याचा फायदा घेत 111 धावांची खेळी खेळली. त्यामुळे सिराजवर विजयाचा दबाव दुप्पट झाला. पाचव्या दिवशी मैदानात उतरण्यापूर्वी त्याने अशी खेळी केली की त्याने एकट्याने विजयाची कहाणी लिहिली. पाचव्या दिवशी त्याने 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
सामन्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, 'काल 19 धावांवर हॅरी ब्रुकचा झेल सोडला आणि त्यानंतर त्याने शतक झळकावलं. यानंतर माझ्यावर दबाव होता. पण मला पूर्ण आत्मविश्वास होता. मी सकाळी उठलो आणि गुगलवर जाऊन बिलीव्ह इमोजी डाउनलोड केला आणि तो वॉलपेपरवर लावला. मला माहित होते की मी ते करू शकतो आणि गेम चेंजर बनू शकतो. मालिकेचा प्रत्येक सामना पाचव्या दिवसापर्यंत चालला आणि आम्हाला खूप मजा आली.'
मोहम्मद सिराज ठरला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
मोहम्मद सिराज या मालिकेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ओव्हल कसोटीत 9 विकेट घेतल्या आणि संपूर्ण मालिकेत 23 विकेट घेतल्या. पाचव्या दिवशी त्याने तीन मौल्यवान विकेट घेतल्या आणि इंग्लंडला 35 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला.
FAQ :
पाचव्या टेस्ट सामन्यात कोण ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'?
मोहम्मद सिराजला शेवटच्या टेस्ट सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला. त्याने या सामन्यात एकूण ९ विकेट घेतले.
भारत - इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये कोण ठरलं 'प्लेअर ऑफ द सीरिज'?
भारताचा कर्णधार शुभमन गिल याला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात एकूण 754 धावा केल्या.
भारताने ओव्हल मैदानावर आतापर्यंत किती सामने जिंकले?
ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 16 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ तीन सामने टीम इंडियाने जिंकलेत.