भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी इंग्लंड दौऱ्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची मुख्य स्पिनर म्हणून निवड करण्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. जडेजाची गोलंदाजी इंग्लंडमधील परिस्थितींमध्ये प्रभावी नसून, जर भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करायचं असेल तर एक चांगला संतुलित संघ मैदानात उतरवावा लागेल. चॅपल यांनी ESPNCricinfo मध्ये लिहिलेल्या लेखात हे मत मांडलं आहे. त्यांनी सल्ला दिला आहे की, भारताने आपल्या तज्ज्ञ खेळाडूंवर विश्वास ठेवायला हवा. फक्त अष्टपैलू खेळाडूंवरच्या सहाय्याने संघ खेळवू नये.
पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाला लीड्समध्ये एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून खेळवण्यात आलं होतं. पण रवींद्र जडेजा गोलंदाजीत काही प्रभाव पाडू शकला नाही. यामुळे जडेजाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
ग्रॅग चॅपेल यांनी लिहिलं आहे की, "जडेजा इंग्लंडमधील परिस्थितींमध्ये प्रमुख फिरकी गोलंदाज नाही. जर त्याच्या फलंदाजीला महत्त्व दिलं जात असेल, तर त्याला सहाय्यक फिरकी गोलंदाज म्हणून भूमिका देऊ शकतो. अन्यथा संघाची निवड करणाऱ्यांना पुन्हा विचार करण्याची गरज आहे". जर भारताला मालिकेत पुनरागमन करायचं असेल तर संतुलित संघ मैदानात उतरवावा लागेल असं मतही त्यांनी मांडलं आहे.
चॅपेल यांनी असंही लिहिलं आहे की, वरच्या फळीतील फलंदाजांचं अपयश लपवण्यासाठी संघात अष्टपैलू खेळाडू किंवा अर्धवेळ गोलंदाजांचा समावेश करणं योग्य रणनीती नाही. ते म्हणाले की, जर तुमचे टॉप सहा फलंदाज धावा काढत नसतील तर त्यावर काम करा, परंतु गोलंदाजीसाठी फक्त 20 विकेट्स घेण्यास सक्षम असलेले संयोजन संघात असले पाहिजे.
माजी प्रशिक्षकांचा असा विश्वास आहे की आता निवडकर्त्यांवर दबाव असून त्यांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील. जर फलंदाज आणि गोलंदाज जोखीम घेऊन खेळण्यास तयार असतील तर निवडकर्त्यांनाही धाडसी निर्णय घेण्याचे धाडस दाखवावे लागेल. दरम्यान, भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी पत्रकार परिषदेत संकेत दिले की नितीश कुमार रेड्डीला बर्मिंगहॅम कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बुधवार, 2 जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल. भारताने पहिला सामना पाच विकेट्सने गमावला आणि आता कर्णधार शुभमन गिलसमोर मोठे आव्हान असेल.