Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs Eng: 'भारताकडून एकच चूक झाली...,' आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'इतकी मोठी धावसंख्या उभारुन...'

Ind vs Eng: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारतावर पराभवाची टांगती तलवार आहे. पाचव्या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज असून, हातात चार विकेट्स आहेत.   

Ind vs Eng: 'भारताकडून एकच चूक झाली...,' आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'इतकी मोठी धावसंख्या उभारुन...'

Ind vs Eng: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा आज शेवटचा दिवस असून, मालिका सुरु झाली तेव्हा कोणीही अखेरच्या दिवशी मालिकेचा निकाल लागेल असा विचार केला नवव्हता. पाचव्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज असून, हातात 4 विकेट्स आहेत. सामन्यातील स्थिती पाहून भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज आर अश्विनने संघावर टीका केली आहे. "काय शेवट आहे! प्रत्येक सामन्यात, अनुभवामुळे संघांनी मूलभूत चुका केल्या आहेत. आज देखील, इंग्लंडला या परिस्थितीत असण्याचा अधिकार नाही," असं अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं आहे. 

भारतीय संघ एका आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचं मत आर अश्विनने मांडलं आहे. "भारतीय संघ एका टप्प्यावर अपयशी ठरला आहे. या खेळपट्टीवर ही खूप मोठी धावसंख्या (374) आहे. भारतीय संघ दबाव निर्माण करणारी आक्रमक गोलंदाजी करत नसल्याने भारत या स्थितीत पोहोचला आहे. याला म्हणतात बचावात्मक दबाव निर्माण करणे. टी-20 च्या युगात जिथे विकेट मिळवणे हेच ब्रीदवाक्य आहे, तिथे विकेट मिळवण्यासाठी लय कशी निर्माण करायची हे महत्त्वाचे आहे," असं अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले.

शुभमन गिल जसजसा वेळ जाईल त्यानुसार कर्णधार म्हणून परिपक्व होईल असंही मत त्याने मांडलं आहे. "स्पिनर्सचा योग्य वापर न करण्याच्या विषयावर परत येताना, मला या मालिकेत खेळाच्या जागरूकतेचा अभाव जाणवला. मैदानावर आणि मैदानाबाहेर आपली रणनीतिक कौशल्यं कमी पडली. या मालिकेत इंग्लंड पुढे आहे आणि भारत मागे आहे याचे हेच मुख्य कारण आहे. आम्ही तीक्ष्णतेने पुढे गेलो नाही," असं अश्विनने म्हटलं आहे. 

"मला वाटतं की शुभमन गिल एक चांगला कर्णधार होईल, तो शिकेल. परंतु कधीकधी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्पिन खरोखर चांगले खेळू शकता, तर तुम्ही स्पिनर्सना आक्रमणासाठी आणणार नाही आणि जेव्हा तुम्ही या परिस्थितीत स्पिनर्सना आणण्याचा क्षण गमावता, तेव्हा स्पिनर खरोखरच बचावात्मक पर्याय बनतो," असे तो पुढे म्हणाला. अशा चुका टाळायला हव्यात असा सल्लाही त्याने दिला. 

"जेव्हा हॅरी ब्रूकने 20 धावा केल्यानंतर आक्रमक खेळी सुरु केली, तेव्हा धावांचा प्रवाह रोखण्यासाठी तुम्ही फिरकी गोलंदाजाला मैदानात आणू शकला असता. दुसऱ्या टोकाकडून वेगवान गोलंदाज गोलंदाजी करू शकला असता. हे सर्व लक्षात घेता, वॉशिंग्टन सुंदरला आक्रमणात लवकर आणता आले असते,” असं अश्विन म्हणाला.

Read More