India vs England: भारताने चांगली सुरुवात करुनही इंग्लंडविरोधातील पहिला कसोटी सामना गमावला आहे. यासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 0-1 ने आघाडी घेतली आहे. भारताने विजयासाठी 371 धावांचं आव्हान समोर ठेवलं असताना, इंग्लंडने अत्यंत सहजपणे त्याचा पाठलाग केला. यासह इंग्लंडने धावांचा पाठलाग करताना कसोटी इतिहासातील आपल्या दुसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान गौतम गंभीरने या पराभवानंतर आपण कोणत्याही एका खेळाडूकडे बोट दाखवून त्याला जबाबदार धरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
भारतीय संघाने या सामन्यात अनेक संधी गमावल्या आहेत. पहिल्या डावात फक्त 41 धावांत भारताने आपले सात विकेट्स गमावले. दुसऱ्या डावातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. फक्त 32 धावात भारताने आपले सहा फलंदाज गमावले. क्षेत्ररक्षणातही भारत फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. भारतीय खेळाडूंनी 8 झेल सोडले ज्यामधील 6 पहिल्या डावात होते. कोणत्याही संघाने इंग्लंडमध्ये खेळताना मागील 20 वर्षात इतके झेल सोडलेले नाहीत. भारतीय खेळाडूंनी गमावलेल्या या संधींमुळे 200 धावांचा फटका बसला.
गोलंदाजीतही बुमराहला इतर गोलंदाजांची साथ लाभताना दिसली नाही. जसप्रीत बुमराहने पहिल्या डाव्यात पाच विकेट्स मिळवल्या होत्या. पण बुमराह वगळता इतर कोणताही गोलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही.
पराभवानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने आपण झेल सोडल्याबद्दल कोणत्याही एका खेळाडूला जबाबदार धरणार नाही असं म्हटलं आहे. पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालने क्षेत्ररक्षण करताना 4 झेल सोडल्याने, त्याच्यावर लक्ष असेल. "झेल सुटतात, जगातील सर्वोत्तम खेळाडूही झेल सोडतात. कोणीही जाणुनबुजून ते सोडत नाही," असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
पहिल्या डावात फलंदाजी कोसळणं हे फार निराशाजनक असल्याचं गंभीरने म्हटलं आहे. प्रयत्नांची कमतरता झाल्याचं मान्य करताना आगामी सामन्यात सुधारणा पाहायला मिळेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
"हो, फलंदाजीच्या दृष्टीकोनातून हे निराशाजनक होतं. पहिल्या डावात आपण 40 धावांत सात विकेट्स गमावले. दुसऱ्या डावात 30 धावात सहा विकेट्स गेले. आम्हाला पहिल्या डावात 600 धावा करणं शक्य होतं. जर आम्ही तितक्या धावा केल्या असत्या तर सामन्यावर वर्चस्व गाजवू शकलो असतो. पण या गोष्टी होत असतात. आम्ही यातून शिकू अशी आशा," असं गंभीर म्हणाला आहे.
"त्यांनी प्रयत्न केले नाहीत अशातला भाग नाही. पण कधीतरी लोक अपयशी होतात आणि त्यावेळी ते स्वत: इतरांपेक्षा जास्त निराश असतात. त्यांनाही कल्पना आहे की, आपण चांगली संधी गमावली आहे. ते नेटमध्ये मेहनन घेत नाहीत असंही नाही. कधीतरी आपले आघाडीचे फलंदाजही अपयशी ठरतात. यातून शिकतील आणि आपले तळातील खेळाडूही चांगली खेळी करतील अशी आशा आहे. पण आम्ही हारण्याचं हे एकमेव कारण नाही," असं गंभीरने सांगितलं आहे.
"मी इथे बसून प्रत्येकाचं नाव घेत तळातील खेळाडूंनी योगदान दिलं नाही असं म्हणणार नाही. आम्ही एकत्र हारलो आणि एकत्र जिंकलो," असं त्याने म्हटलं. पुढे तो म्हणाला "प्रत्येक पराभव हा वेदना देणारा असतो मग संघ तरुण असो किंवा अनुभवी असो. हा भारतीय संघ आहे. पराभवासाठी आम्ही हे कारण देणार नाही, आम्ही 140 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करतो". दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरु होणार आहे.