IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. लीड्समध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा असल्याने याकडे चाहत्यांसह, क्रिकेट विश्लेषकांचंही विशेष लक्ष असणार आहे. मात्र पहिल्या कसोटी सामन्याआधीच एका भारतीय खेळाडूच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये खेळाडूंने कर्माच्या फळाचा उल्लेख केला आहे. या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, वेगवेगळे अंदाज लावले आहेत. खेळाडू कसोट संघात निवड न झाल्याने नाराज असून, त्याचा इशारा गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाकडे आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा खेळाडू जलदगती गोलंदाज मुकेश कुमार आहे, जो इंग्लंडमधून भारतात परतला आहे.
भारतीय जलदगती गोलंदाज मुकेश कुमार इंग्लंड दौऱ्यात ए टीमचा भाग होता. पण त्याला इंग्लंडविरोधातील कसोटी संघात सहभागी करण्यात आलं नाही. यामुळे त्याला इतर खेळाडूंसह मायदेशी परतावं लागलं आहे. 18 जूनला भारतात परतल्यानंतर मुकेशने इंस्टाग्रामला एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलं आहे की, "प्रत्येक कर्माचा वेळेनुसार हिशेब होतो. तुम्ही नेहमी सावध राहायला हवं कारण कर्म क्षमाशील नाही आणि नेहमीच त्याचे फळ मिळते".
मुकेश कुमारने आपल्या स्टोरीत कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण त्याच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अनेक चाहते आणि क्रिकेट जाणकरांच्या मते, ही पोस्ट कसोटी संघात निवड न झाल्याच्या नाराजीतून आहे.
इंग्लंड दौऱ्यावर इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात दोन कसोटी सामने खेळवण्यात आले. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात मुकेश कुमारचाही समावेश होता. सामन्यातील कामगिरीनंतर काही खेळाडूंना कसोटी संघात संधी मिळाली, परंतु मुकेशला भारतात परत पाठवण्यात आलं.
या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पहिल्या सराव सामन्यात मुकेशने 25 षटकांत 3 बळी घेतले आणि 92 धावा दिल्या. त्याच सामन्यात हर्षित राणाने 27 षटकांत 95 धावा देऊन फक्त एक बळी घेतला. तरीही, मुकेशला दुर्लक्षित करून हर्षितला कसोटी संघात स्थान देण्यात आलं असल्याने वादाचे कारण बनले आहे.
हर्षित राणा हा गौतम गंभीरच्या दृष्टीने एक खास खेळाडू असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमधे आहे. गंभीर आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये मेंटॉर होता आणि त्यावेळी हर्षितही संघाचा भाग होता. हर्षितने आयपीएलच्या त्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. इतकंच नाही तर भारताचा मुख्य प्रशिक्षक होताच, हर्षितने भारतीय संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं. बीसीसीआयचे काही नियम पूर्ण न करताही, हर्षितला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी करण्यात आलं. मात्र अनेक अनुभवी खेळाडू अद्याप प्रतिक्षेत आहेत.
31 वर्षीय मुकेश कुमार गेल्या दोन वर्षांपासून भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी अथक मेहनत घेत आहे. त्याने आतापर्यंत 3 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 52 सामन्यांमध्ये 210 विकेट्स घेतल्या आहेत. तरीही, त्याला संघातून वगळणे आणि हर्षितचा समावेश करणे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. जरी बीसीसीआय किंवा स्वतः मुकेशकडून यावर कोणतेही औपचारिक विधान आलेले नाही, परंतु पोस्टची वेळ आणि त्यातील शब्द निश्चितच सूचित करतात की ही पोस्ट गौतम गंभीरबद्दल केली गेली होती.