India vs England Manchester Test: मॅनचेस्टर कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी घडलेल्या घडामोडींनंतर अनेक वाद निर्माण झाले आहेत. यानंतर भारत आणि इंग्लंडमधील खेळाडू त्यावर भाष्य करत आपली मतं मांडत आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगनेही पोस्ट शेअर केली आहे. युवराज सिंगने भारताने सामना अनिर्णित राखण्यासाठी केलेल्या गांभीर्यपूर्ण खेळीचं कौतुक केलं आहे. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 311 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना भारताच्या तीन फलंदाजांनी शतक ठोकलं. या सामन्यात दोन्ही संघांच्या संयमांची परीक्षा झाली ज्यावर इंग्लंड नियंत्रण ठेवू शकला नाही. चौथा सामना अनिर्णित राहिला असला तरी, इंग्लंड संघ पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
युवराज सिंगने एक्सवर पोस्ट करत कर्णधार शुभमन गिलने ठोकलेल्या शतकाचं कौतुक केलं आहे. पहिल्याच मालिकेत चार शतकं ठोकणारा शुभमन गिल पहिला कर्णधार ठरला आहे. यावेळी त्याने संघातील आपलं महत्त्वं सिद्ध करणाऱ्या के एल राहुलचंही कौतुक केलं आहे. तसंच जडेजा आणि सुंदरने दाखवलेला संयम आणि हिंमत पाहून आपण आश्चर्यचकित झालो असल्याचं म्हटलं आहे. 150 धावांची जबरदस्त खेळी करून रिकी पाँटिगला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू झाल्याबद्दल त्याने इंग्लंडच्या जो रूटचंही कौतुक केलं आहे.
"गंभीर स्वभावाशिवाय तुम्ही अशा कसोटी सामन्यात विजय मिळवू शकत नाही, विशेषतः अशा सामन्यात जिथे काहीही सोपे नसते! शुभमन गिलने कर्णधाराला साजीशी खेळी केली आणि कसोटी कर्णधार म्हणून त्याच्या पदार्पणाच्या मालिकेत 4 शतके झळकावत पहिलाच खेळाडू बनला! के एल राहुलने त्याचा अनुभव दाखवला आणि पुन्हा एकदा संघात त्याचे अस्तित्व सिद्ध केले! जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी धीर आणि धाडस दाखवून शतकं झळकावली आणि सामना हाताबाहेर जाऊ दिला नाही! मालिका अद्यापही जिवंत आहे! धावांची संख्या अव्वल स्थानावर नेल्याबद्दल जो रुटचं कौतुक! #INDvENG," असं युवराजने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल (107 चेंडूत 58), साई सुदर्शन (151 चेंडूत 61) आणि ऋषभ पंत (75 चेंडूत 54) यांच्या अर्धशतकांमुळे भारताचा धावसंख्या 358 पर्यंत पोहोचली. स्टोकने भारतीय फलंदाजांना आव्हान दिलं आणि मोठी भागीदारी होऊ दिली नाही.
दुसऱ्या डावात, झॅक क्रॉली (113 चेंडूत 84) आणि बेन डकेट (100 चेंडूत 94) यांनी पहिल्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी केली. जो रूट (248 चेंडूत 150) आणि स्टोक (198 चेंडूत 141) यांनी भारतीय गोलंदांजांचा समाचार घेतला. दोघांनी 311 धावांची आघाडी मिळवताना एकामागून एक टप्पा गाठला. इंग्लंडचा संघ 669 धावांवर गारद झाला.
ख्रिस वोक्सने पहिल्या ओव्हरला दोन विकेट घेत इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र केएल राहुल (230 चेंडूत 90) आणि कर्णधार शुभमन गिल (238 चेंडूत 103) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या संयमाची परीक्षा घेतली. त्यांनी तीन सत्रात फलंदाजी करताना 188 धावांची भागीदारी केली. यानंतर जडेजाने (185 चेंडूत नाबाद 107) आणि वॉशिंग्टन सुंदर (206 चेंडूत नाबाद 101) या फिरकी अष्टपैलू जोडीने त्यांच्या दृढनिश्चयाने इंग्लंडला पूर्णपणे गोंधळात टाकले आणि निराश केले, ज्यामुळे भारताला 114 धावांची आघाडी मिळाली आणि 425 धावांवर 4 अशा स्थितीत आणलं. मालिका अजूनही 1-2 अशी आहे. 31 जुलैपासून ओव्हल येथे अंतिम सामना सुरू होणार आहे.