Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IndvsPak : पाकिस्तानवर बहिष्कार घालण्यासाठी बीसीसीआय आयसीसीला लिहिणार पत्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून याचे पडसाद पाहायला मिळाले.

IndvsPak :  पाकिस्तानवर बहिष्कार घालण्यासाठी बीसीसीआय आयसीसीला लिहिणार पत्र

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून याचे पडसाद पाहायला मिळाले. बीसीसीआय आणि सीओए यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत आगामी वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरोधात होणारा सामना खेळायचा की नाही, याबद्द्ल कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. दिल्लीत ही बैठक पार पडली. या बैठकीला गृह, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या देशासोबत भारताने खेळू नये अशी या मागणीने जोर धरला. 

येत्या 30 मे पासून इंग्लंड मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 16 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीतील सामना होणार आहे. जो देश दहशतावादाला समर्थन देतो, त्या देशावर बहिष्कार टाकावा. या संदर्भात बीसीसीआय आयसीसीला पत्र  लिहणार असल्याचे सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले आहे. 'जो काही दहशतवादी हल्ला झाला आहे, त्या बद्दल आम्ही आमचे प्रश्न आयीसीसीकडे पत्राद्वारे मांडणार आहोत. या पत्रात  'खेळाडू, अधिकारी आणि क्रिकेट चाहत्यांच्या सुरक्षेबाबतही उल्लेख करणार असल्याची माहिती विनोद राय यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

'ज्या देशात दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो, दहशतवादाला खतपाणी घातले जाते, त्या देशासोबत खेळायचे की नाही यावर निर्णय घ्यायला हवा.' असे राय म्हणाले. आजच्या या बैठकीत राय आणि सीओएच्या सदस्या डायना इडुल्जीने या देखील उपस्थित होत्या. वर्ल्ड कप स्पर्धेत 16 जून ला भारत पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीतील सामना होणार आहे. या सामान्यासंदर्भात सुरक्षा आणि एकूणच सर्व परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

''हा सामना होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. आपण या संदर्भात नंतर निर्णय घेऊ. तसेच या संदर्भात सरकार सोबत सखोल चर्चा करु.' असे डायना डायना इडुल्जी म्हणाल्या.

Read More