Sanju Samson’s powerful six strikes female Video : दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारताच्या संजू सॅमसननं मोठ्या ताकदीनं एक षटकार मारला. संजूची ही खेळी या षटकारामुळंच सर्वाधिक चर्चेत राहिली. खेळपट्टीवरून गोलंदाजानं टाकलेला चेंडू त्यानं अगदी सहजपणे सीमारेषेपलीकडे भिरकावला.
हा चौकार असणार की षटकार हे पाहत प्रत्येकाचीच नजर चेंडूवर खिळली आणि पाहता पाहता चेंडूनं वरच्या वर सीमारेषा ओलांडली. भारताच्या खात्यात यामुळं 6 धावा जोडल्या गेल्या खऱ्या. पण, तिथं चाहत्यांमध्ये एका महिला क्रिकेटप्रेमीच्या जबड्यावरच हा चेंडू आदळला आणि तिला काहीच सुचेनासं झालं. चेंडू इतक्या जबर ताकदीनं लागला की भर मैदानात ही महिला चाहती ओक्साबोक्शी रडू लागली.
सामन्याच्या 10 व्या षटकामध्ये हा सर्व प्रकार घडला, ज्यानंतर दुखापतग्रस्त महिलेला तातडीनं आईसपॅक देण्यात आला. ज्यावेळी संजू सॅमसनपर्यंत हा सर्व प्रकार पोहोचला तेव्हा त्यानं याबाबत दिलगिरी व्यक्त केली. या संपूर्ण थरारनाट्यानंतर भारतानं हा सामना खिशात टाकला. दक्षिण आफ्रिकेचा भारतीय संघानं 135 धावांनी पराभव करत 3-1 अशा फरकानं मालिकाही खिशात टाकली.
तिलक वर्माच्या 47 चेंडूंमधील 120 धावांच्या बिनबाद खेळीसह संजू सॅमसननं 56 चेंडूंमध्ये केलेल्या 109 धावा अवघ्या 20 षटकांमध्ये भारतीय संघाची धावसंख्या 283 पर्यंत नेण्यास मदत करुन गेली. परदेशी भूमीवर 20 षटकांच्या सामन्यात टीम इंडियानं केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 18.2 षटकामध्ये अवघ्या 148 धावा करून तंबूत परतला. एकंदरच सामना चर्चेचा विषय ठरला खरा, पण या महिलेला लागलेला चेंडू आणि त्यानंतर संजू सॅमसननं व्यक्त केलेली दिलगिरी जास्त प्रकाशझोतात राहिली हे खरं.
Wishing a quick recovery for the injured fan!
— JioCinema (@JioCinema) November 15, 2024
Keep watching the 4th #SAvIND T20I LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex #JioCinemaSports pic.twitter.com/KMtBnOa1Hj
सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेक अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओवर कैक व्ह्ज, शेअर आणि रिशेअरही आल्याचं पाहायला मिळालं. यानिमित्तानं काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये क्रिकेट सामन्यातील अशाच काही प्रसंगांचाही उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.