Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तू जरा जमिनीवर परत ये,' सचिन तेंडुलकरने भारताच्या स्टार गोलंदाजला सुनावलं अन् नंतर..

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर अनेकांसाठी प्रेरणा आहे. सचिन तेंडुलकरचा आदर्श घेत अनेक तरुणांनी क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत ते साकार केलं आहे.  

'तू जरा जमिनीवर परत ये,' सचिन तेंडुलकरने भारताच्या स्टार गोलंदाजला सुनावलं अन् नंतर..

क्रिकेटचं मैदान असो किंवा मग इतर कोणतंही क्षेत्र असो, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. सचिन तेंडुलकरने क्रिकेटर्सची एक पिढीच तयार केली आहे. विराटपासून अनेकांनी सचिन तेंडुलकरचा आदर्श घेत क्रिकेटची वाट निवडली आणि यशस्वीही झाले. सचिन तेंडुलकरही नवख्या खेळाडूंना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतो. मग तो सल्ला असो किंवा मैदानात जाऊन त्यांना मदत करणं असो. दरम्यान नुकतंच माजी गोलंदाज वरुण अरॉनने सचिन तेंडुलकरने कशाप्रकारे शब्दांनी आपलं मनोबल वाढवलं होतं याचा खुलासा केला आहे. या सल्ल्यामुळे 2011 मध्ये कसोटी पदार्पणात फार मदत झाल्याचं त्याने सांगितलं आहे. 

अरॉनने कसोटी संघात पदार्पण केलं तेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजविरोधात खेळत होता. वानखेडे मैदानात हा सामना सुरु होता. पण अरॉन पहिली विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. याचवेळी सचिनने त्याचं मनोबल वाढवलं. 

"आम्ही वानखेडे मैदानात खेळत होतो. खेळपट्टी सपाट होती. वेस्ट इंडिज संघ 500 धावांवर 4 गडी बाद स्थितीत होता. मी फारच खचलो होतो. मी 21 वर्षांचा होतो आणि कधीच एकही विकेट न मिळवता सलग 21 ओव्हर्स टाकल्या नव्हत्या. सचिन तेंडुलकर मिड-ऑफला होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि इतका निराश का आहेस? असं विचारलं. त्यावर मी त्याला सांगितलं की, पाजी मी कधीच विना विकेट 21 ओव्हर्स टाकलेल्या नाहीत. माझ्या पहिल्याच सामन्यात असं होत आहे यावर विश्वास बसत नाही असं सांगितलं," अशी माहिती वरुण अरॉनने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत दिली.

"सचिनने मला त्याच्याकडे बोलावलं. आम्ही ओव्हर सुरु असतानाच थांबलो. त्याने सांगितलं की, तुला माहिती आहे का मी वर्ल्डकप जिंकण्यासाठी 22 वर्षं वाट पाहिली. त्यामुळे तू पहिली विकेट मिळवण्यासाठी 21 ओव्हर्स वाट पाहू शकतोसच. त्यामुळे त्यात काही समस्या नाही. तू जमिनीवर ये आणि गोलंदाजी करत. मला त्याचं म्हणणं पटलं, कारण त्यात अर्थ होता. मला पुढच्याच चेंडूवर ब्रावोची विकेट मिळाली. यानंतर मला अजून दोन विकेट मिळाले. यामुळे माझ्या पहिल्या सामन्यातील कामगिरीत बदल झाला," असं वरुण अरॉनने सांगितलं.

"सचिन तेंडुलकरच्या काही शब्दांनीच मला प्रेरणा मिळाली. सॅम्यूअल्सची विकेटही मला मिळाली असती, पण त्याचा कॅच ड्रॉप झाला. जर मला ती विकेट मिळाली असती तर काय माहिती आणखी एक विकेट मिळवू शकलो असतो. सचिन तेंडुलकरकडून प्रेरणा मिळाल्याने माझा तो स्पेल चांगला झाला. यावरुन समजतं की तुमच्या करिअरमध्ये छोट्या गोष्टीही मोठा परिणाम करु शकतात," असं वरुण अरॉन म्हणाला.

वरुण अरॉनने भारताकडून 9 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 18 विकेट्स घेतले. फेब्रुवारी महिन्यात त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 

Read More