Indian Cricketer Had Suicidal Thoughts: भारताचा अनुभवी क्रिकेटपटू क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) धनश्री वर्मासोबतच्या (Dhanashree Verma) घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मौन सोडले. पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात नेमकं आपलं कुठं चुकलं याबद्दल चहल मनमोकळेपणे बोलला. आपली नेमकी काय चूक झाली याबद्दल त्याने उघडपणे सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला चहलने धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटाच्या अफवांमध्ये फसवणुकीच्या आरोपांनंतर आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचंही चहलने सांगितलं.
चहल आणि धनश्रीने 2020 मध्ये लग्न केले होते, परंतु लग्नाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला. यूट्यूबर राज शमानीशी बोलताना, 35 वर्षीय चहलने खुलासा केला की दोघांनीही पूर्णपणे विभक्त होईपर्यंत आणि विभक्त होण्याची प्रक्रिया अंतिम होईपर्यंत सर्व काही अगदी खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. "हे (आमच्यातील घटस्फोटासंदर्भातील प्रक्रिया आणि वाद) बऱ्याच दिवसांपासून चालू होते. आम्ही सारं काही लोकांना दाखवायचे नाही असं ठरवलं होतं. आम्ही सर्वजनिकरित्या काहीही बोलणार नाही. आम्ही सोशल मीडियावर सामान्य जोडप्यासारखे राहू," असं ठरवलेलं, अशी माहिती चहलने दिली.
वर्षाच्या सुरुवातीला घटस्फोटाच्या कारवाईदरम्यान "फसवणूक करणारा" म्हणून संबोधल्याबद्दल चहलनेही उघडपणे मत व्यक्त केलं. "मला वाटते जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा लोकांनी माझ्यावर फसवणूक करणारा असल्याचा आरोप केला. पण मी माझ्या जवळच्या लोकांसाठी नेहमीच मनापासून विचार करतो. मी माझ्या आयुष्यात कधीही फसवणूक केलेली नाही. मी अशा प्रकारचा माणूस नाही. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त विश्वासू कोणीही सापडणार नाही. मी कधीच कसली मागणी करत नाही, मी नेहमीच समोरच्याला काहीतरी देण्यात धन्यता मानणारा आहे. जेव्हा लोकांना काहीही माहित नसते, तेव्हा ते मला दोष देत राहतात, तेव्हा तुम्ही उलट-सुलट विचार करायला सुरुवात करता," असं चहल म्हणाला.
"मला दोन बहिणी आहेत आणि मी लहानपणापासूनच त्यांच्यासोबत वाढलो आहे, मला महिलांचा आदर कसा करायचा हे माहित आहे. माझ्या पालकांनी मला त्यांचा आदर कसा करायचा हे शिकवले आहे. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून आयुष्य कसं जगायचं याचे धडे घेतले आहेत. जर माझे नाव एखाद्याशी जोडले जात असेल तर लोकांना त्याबद्दल काहीही लिहावे लागते, फक्त ते पाहिलं जावं एवढाच त्याचा उद्देश असतो," असं खोचक विधान चहलने केलं.
घटस्फोटाच्या कालावधीमध्ये एका वेळेस एवढा तणाव होता की आपण आत्महत्येचाही विचार केला होता असा गौप्यस्फोट चहलने केला. सार्वजनिकरित्या केली जाणारी विधानं आणि त्याच वेळी वैयक्तिक पातळीवर अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना संघर्षांना तोंड देत असल्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला, असं चहल म्हणाले. मला रात्री झोप यायची नाही. मी नैराश्येत गोलो होतो. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचे विचारही आले, असं चहल म्हणाला.
"माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते, मी माझ्या आयुष्याला कंटाळलो होतो. मी रोज 2 तास रडायचो. फक्त 2 तास झोपायचो. ते सलग 40 ते 45 दिवस हे चालालं. मला क्रिकेटमधून ब्रेक हवा होता. मी क्रिकेटमध्ये खूप व्यस्त होतो. मी लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी माझ्या मित्रासोबत आत्महत्येचे विचार शेअर करायचो. ते मला धीर द्यायचे मात्र मला त्यावेळी फार भीती वाटायची," असं संघर्षाच्या काळाबद्दल बोलताना चहलने सांगितलं.