Indian Cricketers Career Almost Finished: भारतीय संघातील एका नामांकित खेळाडूचं करिअर संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या खेळाडूचे भारताच्या कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 संघात पुनरागमन होणं जवळपास अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या खेळाडूला आधी कसोटी संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर टी-20 संघातून वगळण्यात आले आणि नंतर या क्रिकेटपटूला एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघाच्या या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपलेली आहे, असं सांगितलं जात आहे. हा खेळाडू आहे तरी कोण ते पाहूयात...
ज्या खेळाडूचं आता करिअरच उरलेलं नाही असा दावा केला जातोय त्याचं नाव आहे, भुवनेश्वर कुमार! सध्याची एकंदरित परिस्थिती पाहता आता या क्रिकेटपटूकडे केवळ निवृत्तीचा पर्याय उरला आहे. भुवनेश्वर कुमारने 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. टी-20 बद्दल बोलायचं झालं तर भुवनेश्वर कुमारने 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमार त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी केलेली. या कामगिरीच्या जोरावर तो सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता. मात्र त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली.
यानंतर भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात पुन्हा कधीही संधी मिळाली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार हा टीम इंडियाची सर्वात उत्तम गोलांदाजांपैकी एक आणि भारतीय संघासाठी एक हुकुमी एक्का होता. भुवनेश्वर कुमार दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करायचा. गरज पडली तेव्हा त्याने बॅटींगमध्येही आपली चमक दाखवली. अनेकदा त्याने फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमारने 63 धावा केल्या होत्या आणि 4 महत्त्वाच्या विकेटही काढल्या होत्या.
भुवनेश्वर कुमारचा वेग आता मंदावला आहे. कार्किर्दीच्या सुरुवातीला त्याच्याकडे टप्प्यासंदर्भातील अचूकता होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन तो चेंडू स्विंग करत विकेट्स घ्यायचा. भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीमध्ये नजरेत भरेल अशी पडझड पाहायला मिळत आहे. भुवनेश्वर कुमारचा वेगही बराच कमी झाला आहे. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत ना वेग आहे आणि ना तो त्याच्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांमध्ये भीती निर्माण करू शकतो, अशी सध्याची अवस्था आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषक आणि 2022 च्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारताच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक भुवनेश्वर कुमार ठरलेला. भुवनेश्वर कुमारनेही या वेळी गोलंदाजी करताना खूप धावा दिल्या होत्या.
सध्याची परिस्थिती पाहता भारताकडे अनेक तरुण वेगवान गोलंदाज असल्याने भुवनेश्वरला भारतीय संघात जागा मिळण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. म्हणूनच त्याचं करिअर संपलं असं मानलं जात आहे. आता तो निवृत्तीची अधिकृत घोषणा केव्हा करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शेवटचा सामना खेळण्याची संधीही त्याला देण्याची निवड समितीची इच्छा नाही, असं सांगितलं जात आहे.