Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा

बांगलादेशविरोधातील (Bangladesh) सामन्यातून मयांक यादवने (Mayank Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं आहे. दरम्यान यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे.   

'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या मयांक यादवने अखेर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. रविवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून दारुण पराभव केला. रविवारी झालेल्या या सामन्यात मयांकने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं. मयांकने फक्त वेगवान गोलंदाजीच केली नाही, तर त्याने वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकत भिन्नता दाखवली. सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने आपल्याला सामन्याआधी दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं. 

"पदार्पण करत असल्याने मी फार उत्साही होतो, पण थोडासा घाबरलेलाही होतो. दुखापतीनंतर मी या मालिकेतून पुन्हा एकदा पदार्पण करत होतो. मी स्पर्धात्मक क्रिकेट खेळलो नाही आणि आता थेट पदार्पण झालं. त्यामुळेच मनात थोडीशी भिती होती," असं मयांक यादव जिओ सिनेमाशी संवाद साधताना सांगितलं. 

"रिकव्हरीचा काळ माझ्यासाठी फारच संघर्षमय होता. गेल्या चार महिन्यात माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण माझ्यासापेक्षा जास्त जे माझ्यासह कार्य करत होते त्यांच्यासाठी हे आव्हानात्मक होतं," असं तो पुढे म्हणाला.

मयांकने यावेळी वेगवान होण्यापेक्षा सामन्यात अचूक गोलंदाजी करण्यावर आपला जास्त भर असल्याचं सांगितलं आहे. पहिल्या सामन्यात जास्त विकेट घेण्यापेक्षा कमी धावा देणं जास्त महत्त्वाचं होतं. "आज माझं माझ्या शऱिरावर जास्त लक्ष होतं. तसंच आजच्या सामन्यात जास्त वेगाने गोलंदाजी करण्यापेक्षा योग्य ठिकाणी करण्यावर होता. मी माझ्या वेगाबद्दल फार विचार केला नाही. मी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न केला," असं मयांक म्हणाला.

पुढे तो म्हणाला की, "आयपीएलमध्ये मी अनेक धीम्या गतीने चेंडू टाकले. मी कर्णधाराशी चर्चा केली असता त्याने मला व्हेरिएशन कऱण्यापेक्षा स्टॉक बॉलवर विसंबून राहण्यास सांगितलं. पण ग्वालियरमध्ये चेंडू जास्त उसळी घेत असल्याने मी त्यानुसार वेग बदलला".

यावेळी त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नेमका काय सल्ला दिला याचाही खुलासा केला. आपल्या पहिल्या सामन्याबद्दल फार विचार करु नको असं गंभीर त्याला म्हणाला होता. तसंच आपल्या मूळ गोष्टींवर ठाम राहणं हीच यशाची किल्ली असल्याचं त्याने सांगितलं होतं.

"अतिरिक्त काहीही नाही, त्याने मला मूलभूत गोष्टींना चिकटून राहण्यास सांगितले आणि भूतकाळात माझ्यासाठी सकारात्मक परिणाम मिळालेल्या गोष्टी करण्यास सांगितले. त्याने मला वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल जास्त विचार न करण्याचा किंवा हा एक आंतरराष्ट्रीय खेळ आहे असंही समजू नको सांगितलं. ती प्रक्रिया महत्त्वाची होती," असं मयांक म्हणाला. 

Read More