इंडियन प्रीमिअर लीग 2024 साठी 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. दुबईत ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावासाठी सर्व 10 संघांनी तयारी केली आहे. दुसरीकडे बीसीसीआयने सर्व संघांना आपली रिटेंशन यादी देण्यास सांगितलं आहे. यासाठी 26 नोव्हेंबर डेडलाइन आहे. यादरम्यान खेळाडूंच्या रिटेंशनसंबंधी नवी माहिती समोर येत आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ काऊंटी क्रिकेट खेळताना जखमी झाला असून, गुडघ्याला दुखापत झाली आहे. दुसरीकडे शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला रिलीज केलं आहे.
केकेआरने शार्दुल ठाकूरला आयपीएल 2023 च्या लिलावात 10.75 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. म्हणजेच शार्दुलला रिलीज केल्याने केकेआरच्या पर्समध्ये 10.75 कोटी जमा झाले आहेत. शार्दुल ठाकूर वर्ल्डकप संघाचा भाग होता. पण त्याला फक्त 3 सामने खेळण्याची संधी मिळाली होती.
दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि संचालक सौरव गांगुली यांना पृथ्वी शॉच्या क्षमतांवर विश्वास आहे. यामुळेच जखमी असतानाही त्यांनी पृथ्वी शॉला संघात जागा दिली आहे. आयपीएल 2024 आधी पृथ्वी शॉ फिट होईल अशी आशा आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने सरफराज खान आणि मनिष पांडे यांना आधीच रिलीज केलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादने फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद आणि मयंक डांगर यांची अदलाबदल केली आहे. शाहबाज आता सनरायजर्स हैदराबाद आणि मयंक बंगळुरु संघासाठी खेळताना दिसणार आहेत. दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने आयपीएल 2024 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रुट राजस्थान रॉयल्स संघात होता.
NEWS
— IndianPremierLeague (@IPL) November 26, 2023
Shahbaz Ahamad traded to Sunrisers Hyderabad, Mayank Dagar traded to Royal Challengers Bangalore.
Details #IPL https://t.co/s8E89KZP9D
आयपीएल रिटेंशनमध्ये सर्वात मोठी अपडेट गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समधून येण्याची शक्यता आहे. ESPN CricInfo नुसार, गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्स संघात परतू शकतो. हार्दिकने 2015 मध्ये मुंबई संघातून आपलं आयपीएल करिअर सुरु केलं होतं. हा ट्रेड पूर्णपणे रोख असणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये देणार आहे. जर हा करार यशस्वी झाला तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा प्लेअर ट्रेड असेल.