IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघासाठी आयपीएलचा सध्याचा हंगाम फारच अयशस्वी ठरला आहे. गुणतालिकेत चेन्नई संघ शेवटच्या स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगने संघ शेवटच्या स्थानावरच राहण्यास पात्र असल्याची कबुली दिली आहे. तसंच चांगल्या कल्पनांसह संघ पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आयपीएलमधील सर्वात सातत्यपूर्ण संघांपैकी एक, पाच वेळा विजेता असणारा चेन्नई संघ राजस्थान रॉयल्सच्या मागे शेवटच्या स्थानावर आहे. मंगळवारी या हंगामातील त्यांच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात राजस्थानकडून त्यांना सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
सर्वात यशस्वी संघांपैकी एक गणल्या जाणाऱ्या चेन्नई संघाच्या या कामगिरीची चाहत्यांना सवय आणि अपेक्षा नाही. "नाही, नक्कीच आम्हाला येथे पराभूत होण्यास आवडत नाही. ही आमच्यासाठी प्रेरणा नाही. आम्हाला फक्त चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. आम्ही काही कामगिरी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचं ध्येय चांगलं प्रदर्शन करणं होतं (गेल्या दोन सामन्यांमध्ये)," असं स्टिफन फ्लेमिंगने सांगितलं आहे.
सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फ्लेमिंगने सांगितलं की, "आता शेवट करणे हा एक चांगला क्षण असेल. आम्ही तळाशी आहोत हे कदाचित योग्यच आहे. आम्ही अशा प्रकारचे क्रिकेट खेळलो आहोत, त्यामुळे ते लपवू शकत नाही".
आम्हाला पुढचा मार्ग माहिती आहे आणि आघाडीचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरणं याने धावसंख्येत मोठी भूमिका बजावल्याचंही त्याने सांगितलं. "या टप्प्यावर आमचा क्रम योग्य नाही आणि आम्ही नेहमीच त्यात फेरबदल करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढच्या वर्षीसाठी आमच्याकडे काही चांगल्या कल्पना आहेत, त्यामुळे त्या सर्व पैलूंचा विचार केला असून, समावेश केला आहे. परंतु टॉप-ऑर्डरने धावा न केल्याने यावर्षी ते शक्य झालं नाही," असं तो म्हणाला.
"बऱ्याच फलंदाजांच्या स्थानांवरून आमची सुरुवात किती चांगली आहे यावर अवलंबून असते आणि नंतर खेळाडू योग्य स्थितीत येऊ शकतात. आम्हाला ते मिळाले नाही. त्यामुळे आम्ही चांगल्या डावांची रचना करण्याऐवजी फक्त डाव जुळवून घेत आहोत," असं सांगत त्याने खराब कामगिरीचं कारण स्पष्ट केलं.
वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज या हंगामात त्याच्या वेगाने प्रभावित करण्यात यशस्वी झाला आहे आणि इंग्लंड दौऱ्यासाठी अ संघात निवड झाल्यानंतर फ्लेमिंगला तो भारतासाठी एक चांगला पर्याय ठरेल असा विश्वास वाटत आहे.