IPL 2025 Final Orange Cap And Purple Cap Winner: इंडियन प्रिमिअर लीगचं 18 वं पर्व बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने आपल्या नावावर केलं. मात्र अंतिम सामन्यात न खेळलेल्या दोन खेळाडूंना काल आयपीएलच्या बक्षीस वितरण समारंभात विशेष पुरस्कारांनी सन्मानित आले. विशेष म्हणजे हे दोघेही एकाच संघातील खेळाडू असून हा संघ अंतिम सामना खेळलाही नाही. तसेच हे दोघेही दक्षिण भारतीय खेळाडू असून या दोघांच्या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावरच त्यांच्यावर आता बीसीसीआयने इंग्लंडच्या दौऱ्याही मोठी जबाबदारी सोपवली आहेत. हे दोघे आहेत तरी कोण आणि त्यांनी केलंय काय पाहूयात...
दरवर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेंज कॅप यंदा गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने पटकावली आहे. या 23 वर्षीय खेळाडूने यंदाच्या पर्वात दमदार कामागिरी केली. साई सुदर्शनने लीग स्टेज आणि प्लेऑफचा एक अशा एकूण 15 सामन्यांमध्ये 15 डाव फलंदाजी केली. त्याने 156 च्या स्ट्राइक रेटने 759 धावा केल्या.
साई सुदर्शनची धावांची सरासरी 54 इतकी राहिली. त्याने 5 वेळा 30 किंवा त्याहून अधिक आणि 6 वेळा 50 हून अधिक धावा केल्या. या पर्वात साई सुदर्शनने एक शतकही झळकावलं. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 108 ठरली. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या साई सुदर्शनला 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.
दुसरीकडे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या पर्वात या पर्पल कॅपचा मानकरीही गुजरातचाच खेळाडू ठरला आहे. यंदा पर्पल कॅप गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने मिळवली आहे. त्याने 19 धावांमागे एक विकेट या सरासरीने 25 विकेट्स घेतल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये 59 ओव्हर गोलंदाजी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने 488 धावा दिल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी 41 धावांमध्ये 4 गडी अशी ठरली. त्याने दर ओव्हरला साधारण 8 धावा दिल्या. दोन वेळा त्याने तीन किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. 29 वर्षीय प्रसिद्ध कृष्णाला पर्पल कॅप विजेता म्हणून बीसीसीआयकडून 10 लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे याच महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर पाच कसोटी खेळण्यासाठी जात असलेल्या भारतीय संघात या दोघांचाही समावेश असल्याने आयपीएलमधील त्यांचा फॉर्म त्यांनी कायम राखला तर भारतीयांना या दोघांकडून अधिक अपेक्षा ठेवायला हरकत नाही.